दहावी-बारावीचा निकाल चुकीचा? : अपेक्षेपेक्षा कमी गुणांमुळे नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या निकालावर अनेक विद्यार्थी व पालकांनी आक्षेप घेतला आहे. शाळा-महाविद्यालयांनी राज्य मंडळाकडे पाठवलेल्या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांना क्षमतेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी असमाधानी असून त्यांनी निकालात दुरुस्ती करून देण्याची मागणी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून, मागील वर्षाच्या व अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. परंतु, निकालासाठी वापरण्यात आलेल्या सूत्रामुळे काही विद्यार्थ्यांना कमी गुण, तर काहींना क्षमतेपेक्षा अधिक गुण मिळाल्याची भावना पालकांकडून व्यक्त केली जात आहे. एकाच वर्गात शिक्षण घेतलेल्या हुशार विद्यार्थ्याला कमी गुण आणि बौध्दिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्याला जास्त गुण मिळाल्याचेही विद्यार्थी निदर्शनास आणून देत आहेत. तरीही निकालात दुरुस्ती करून दिला जात नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची भावना आहे.
चौकट
परीक्षा नाही ; पुनर्मूल्यांकनही नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे लेखी परीक्षा झालीच नाही. शाळा-महाविद्यालयांनी राज्य मंडळाकडे पाठवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची संधी उपलब्ध नाही. त्यामुळे चुकीचे गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
चौकट
“माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. क्षमता असूनही कमी गुण मिळाल्याने आम्ही निकालाबाबत असमाधानी आहोत. आधीच ‘कोरोना बॅच’चा शिक्का आणि त्यात कमी गुण मिळाल्याने आमच्या पुढील शिक्षणावर परिणाम होणार आहे. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या चुकीचा फटका आम्हा विद्यार्थ्यांना बसत आहे.”
-राधिका राका, विद्यार्थी
चौकट
“कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती राज्य मंडळाच्या संगणकीय प्रणालीत भरल्याने विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. कर्मचाऱ्यांच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून याची जबाबदारी महाविद्यालये स्वीकारत नाहीत. निकालात दुरुस्ती करण्यासही टाळाटाळ केली जात आहे.”
- कल्पना राका, पालक
चौकट
“अनेक विद्यार्थ्यांनी निकालाबाबत विभागीय मंडळाकडे तक्रार केली. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यावर संबंधित विद्यार्थ्याला मिळालेले गुण आणि शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी संगणकीय प्रणालीत पाठवलेले गुण पडताळून पाहिले.”
- संगीता शिंदे, सह सचिव, पुणे विभागीय शिक्षण मंडळ, पुणे
चौकट
जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
इयत्ता नोंदणी केलेले विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी
दहावी १ लाख ३० हजार २५ ---१ लाख २९ हजार ९६२
बारावी १ लाख १९ हजार १३ ---१ लाख २८ हजार ६८०
------------------------