राजगुरूनगर (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात देशातील अनेक विरोधक एकवटले आहेत. इंडिया आघाडीच्या ट्रेन गाडीला गार्ड आणि ड्रायव्हर नसेल तर गाडी कशी चालणार ? विरोधकांचा नेता व झेंडा देखील अद्याप ठरला नाही. कितीही विरोधक एकवटले तरी ते मोदींच्या पुढे ते टिकणार नाहीत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
संतोषनगर (भाम) येथे पुणे जिल्हा उत्तर विभाग भाजप कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर साई लॉन्स मंगल कार्यालयात जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री संजयबाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, आशा बुचके, अतुल देशमुख, जयश्री पलांडे, शांताराम भोसले, राम गावडे, प्रिया पवार, सुनीता बुट्टे पाटील, शिवाजी मांदळे, कल्पना गवारी आदींसह जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी क्रियाशील कार्यकर्ते यांचा सत्कार झाला. जिल्हा कार्यकारिणीत निवड झालेल्या कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.
अडीच वर्षे राज्यात भाजपची सत्ता नसताना एकही कार्यकर्ता व आमदार पक्षातून बाहेर गेला नाही. शरद बुट्टे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्व निवडणुका पक्षाच्या माध्यमातून जिंकायच्या आहेत. पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
पुणे जिल्ह्यातून खासदार व सर्वाधिक आमदार पक्षाचे निवडून येणार आहेत. पालकमंत्री पाटील यांनी सर्वाधिक निधी पुणे जिल्ह्यात देऊन विकासाची गंगा आणली. पुणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे बाळा भेगडे म्हणाले.
कार्यक्रमाचे नियोजन सुनील देवकर, काळुराम पिंजन, दत्तात्रय मांडेकर, शरद निखाडे, रोहित डावरे पाटील, मेजर दत्तात्रय टेमगिरे, शिवाजी डावरे आदींनी केले. सूत्रसंचालन आदेश टोपे यांनी केले. आभार भगवान शेळके यांनी मानले.
पक्षात ताकदीची फळी निर्माण करणार
प्रास्ताविक करताना बुट्टे पाटील म्हणाले, काम करणाऱ्या प्रामाणिक व जनाधार वाढवणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षात संधी देऊन पक्षात ताकदीची फळी निर्माण करणार आहे. संधी मिळाली नाही म्हणून बाजूला कुणीही राहू नका. पक्षाच्या निवडणुकीत निवडणूक प्रमुखांनी सहकार्य करावे.