वेल्हे : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना भोर, वेल्हे आणि मुळशी या तीन तालुक्यांत मिळून केवळ १९ हजारांचे मताधिक्य मिळाले. मग भोर, वेल्हे, मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारामती लोकसभा संघटक वसंत मोरे यांनी केला.
भोर मतदारसंघाचे आमदार काँग्रेसचे आहेत. या तीनही तालुक्यांतील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदा, नगरपालिका या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. असे असूनही या तीन तालुक्यांत खासदार सुप्रिया सुळे यांना १९ हजारांचे मताधिक्य आहे. पवारांच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून तो ढासळायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
चेलाडी ते वेल्हे हा ३० किलोमीटरचा रस्ता लोकप्रतिनिधींना नीट करता आलेला नाही. या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. मढेघाट फोडणार असे निवडणुकीच्या वेळी दिले जाणारे आश्वासन खोटे असून, तालुक्यातील जनतेने आता या प्रस्थापित नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. वेल्हे तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा दोन नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षाची ताकदही मोठी आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम करून पक्षाची ताकद वाढविण्यात येईल, असे पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी सांगितले.