पुणे : एखादा पेशंट उपचारादरम्यान दगावला अथवा अन्य कोणत्याही किरकोळ कारणास्तव अनेकदा पेशंटचे नातेवाईक, समाजसेवक रुग्णालयाला अथवा डॉक्टरांना वेठीस धरतात. रुग्णालयाचे बिल कमी करण्यासाठी अथवा बिल माफ करण्यासाठी या क्लृप्त्या लढवल्या जातात. यापुढे अशाप्रकारे रुग्णालयासह डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
गेल्या आठवड्यात शहरातील एका रुग्णालयात पेशंट उपचारादरम्यान दगावला. यानंतर पेशंटचे नातेवाईक व समाजसेवकांनी रुग्णालयात गर्दी करत पेशंट दगावलाच कसा, संपूर्ण बिल माफ करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. यामुळे काही काळ रुग्णालयातील वातावरण गंभीर झाले होते. अशा घटना शहरात अनेकदा होत असल्याने, पोलिस प्रशासनाने रुग्णालयांसह डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टर संघटनेने व्यक्त केले होते. यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा प्रकरणांमध्ये रुग्णालय तसेच डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही, असे आदेश पोलिस उपायुक्तांसह सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहेत.तसेच रुग्णालय अथवा डॉक्टरांविषयी तक्रार असेल तर त्यासाठी आयएमए सारख्या संस्थांकडे तक्रार करता येते, त्यात जर रुग्णालय प्रशासन अथवा डॉक्टर दोषी असतील तर कारवाई केली जाते, त्यामुळे नागरिकांनी अशाप्रकारे रुग्णालय प्रशासनाला वेठीस धरणे चुकीचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
अनेकदा पेशंटचे नातेवाईक अथवा अन्य काही लोक डॉक्टरांना अथवा रुग्णालय प्रशासनाला वेठीस धरतात. विशेष करून पेशंट दगावल्यानंतर हे प्रकार घडतात. मात्र, पेशंटच्या नातेवाइकांनी योग्य त्या मार्गांचा अवलंब करणे गरजेचे आहे. यापुढे शहरातील कोणत्याही रुग्णालयाला अथवा डॉक्टरांना वेठीस धरले तर त्यांच्यावर अजामीनपात्र कलमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेत. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे