पुणे : काश्मीर असो किंवा चीन हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्द्यांवर सोडवता येणे शक्य नाही. पंडित नेहरूंनी शरणागती न पत्करता काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला. तो एक धोरणाचा भाग होता. काश्मीरप्रश्नी नेहरूंना जबाबदार धरणे चुकीचे आहे, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत आणि ‘लोकमत’चे नागपूर आवृतीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.‘साधना’ साप्ताहिकाच्या वतीने यदुनाथ थत्ते स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत ‘नेहरू : देशाचे पंतप्रधान’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.द्वादशीवार म्हणाले, पंडित नेहरूंना पंतप्रधानपदाची कारकिर्द ही एकटेपणानेच सुरू करावी लागली. नेहरू समाजवादाची बीजे रोवू पाहत होते, मात्र त्यांना जयप्रकाश नारायण यांनी विरोध दर्शविला. भांडवलदारांच्या मदतीने नेहरू समाजवाद आणि फॅसिझम आणू पाहत आहेत, अशी टीका करणारे पत्र त्यांनी लिहिले. सरदार पटेल यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, अशी भूमिका मांडली होती. ती पंडितजींना मान्य नव्हती. अशा प्रकारे नेहरूंना त्यांच्या प्रवासात स्वकीयांविरुद्धच अनेकदा संघर्ष करावा लागला. गांधीजींची हत्या ही घटना नेहरू आणि पटेल यांचे मनोमिलन घडविणारी ठरली. त्यांच्यात मतभेद होते पण कटुता नव्हती. गांधीजी आणि पटेल यांच्यानंतर नेहरूंनी देशाचे एकाकी नेतृत्व केले. नेहरू खऱ्या अर्थाने देशाचे भाग्यविधाते होते.काश्मीर आणि चीनप्रश्नी नेहरूंना जबाबदार धरले जाते, मात्र हा प्रश्न आजही सुटू शकलेला नाही, सरकार बदलले पण प्रश्न जैसे थेच राहिला आहे. एकवेळ पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक करू शकतो पण डोकलाममध्ये ते शक्य नाही. या गोष्टी समजून न घेता गांधी आणि नेहरूंना शिव्या दिल्या जातात तेव्हा लोकच दुबळे वाटतात. चीनच्या अध्यक्षांना गुजरातचा ढोकळा खायला दिला जातो पण याने मोदीप्रेम वाढेल, भारतप्रेम वाढेल का? अशा शब्दांत द्वादशीवार यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला टोला लगावला.
काश्मीरप्रश्नी नेहरू जबाबदार कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 5:54 AM