पुणे : "रोजची मारहाण, आरडाओरडा... घरात होणारी भांडणं... बायका-पोरांवर ढोरांसारखा अत्याचार... त्यातून होणाऱ्या आत्महत्या अन मृत्यू... तारुण्यातच कपाळाचं कुंकू पुसणं... चिमुकल्यांच्या डोक्यावरचं बापाचं अगर आईचं छत्र जाणं... अख्खा संसार आणि कुटुंब उद्ध्वस्त होणं... हे सगळं होत असताना निमूटपणे सहन करणं हेच स्त्रीच्या नशिबी..." पण आता नाही. त्याही जाग्या झाल्यात, उभारताहेत या दारुरूपी राक्षसाचा सामना करण्यासाठी. या लढ्यातल्या आणि दारूच्या पीडिता ठरलेल्या महिलांच्या कहाण्यांना वाचा फुटणार आहे.
स्वामिनी दारूमुक्ती आंदोलन आणि साद माणुसकीची या सामाजिक चळवळींच्या पुढाकारातून या दारूपिडीत महिलांच्या मुलाखतीचा व सत्य घटनांवर आधारित नाटिकांचा कार्यक्रम आयोजिला आहे. येत्या गुरुवारी (दि. १२ जुलै २०१८) सायंकाळी ६.०० वाजता घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजीतील दारूपिडीत कुटुंबातीलच महेश पवार या युवकाने उभारलेल्या या चळवळीबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी साद माणुसकीचे हरीश बुटले, संदीप बर्वे, ज्ञानेश्वर जाधवर, सचिन अशा सुभाष, अभिजित मंगल, गणेश सातव यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.
महेश पवार म्हणाले, "फक्त यवतमाळ जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात दारूमुळे भयावह परिस्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी युवकांनी दारूबंदी साठी उभा केलेल हे अंदोलन आहे. हा प्रश्न फक्त त्या महिलेचा नाही, तर संपूर्ण कुटूंबाचा आहे. कुटूंब सावरायचे असेल, तर ज्या घरात दारूच व्यसन केलं जात ते बंद व्हाव म्हणुन युवकांनी पुढ येवून २८ मार्च २०१५ ला घाटंजी मध्ये दारूबंदीचा पहिला एल्गार केला आणि त्यातूनच 'स्वामिनी दारूबंदी आंदोलनाचा' जन्म झाला. त्यादिवसापासून सतत आंदोलन वाढत गेली, महिलांचा सहभाग वाढला, युवकांनी पुंढ येवून जोरात काम करायला सुरूवात झाली."
"स्वामिनी दारूबंदी आंदोलनाविषयी लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली. बघता बघता ३५० गावांमध्ये स्वामिनीचे जाळे पसरले. त्यातून दोनशेहून अधिक गावातील दारूची दुकाने बंद करण्यात आंदोलनाला यश आलं. पण काही ठिकाणाहून न्यायालयीन लढाई सुरु झाली. केसेस अंगावर पडल्या, हल्ले झाले, धमक्या मिळाल्या, अटक झाली. पण आम्ही डगमगलो नाहीत. पुढे तिरडी आंदोलन, चटके आंदोलन, दारू चले जाव आंदोलन अशा वेगवेगळ्या आंदोलनामधून युवकांच नेतृत्व व संघटन अजूनच सक्षम होत गेलं. आणि लाखो महिला, युवक आणि पुरूष या लढाईचे शिलेदार बनले."
हरीश बुटले म्हणाले, “दारूच्या व्यसनामुळे आमचा संसार उधवस्त झालाय, सर्व जमिन-जुमला मालमत्ता तर बुडालीच पण आम्ही मनाने देखिल खचलो आहोत... यातुन आम्हांला वाचवा” असं सांगण्यासाठी आजवर खूप आंदोलन केली आहेत. यवतमाळ ते मुंबई ७०० कि.मी. अंतर शेतीतील कामे सोडून पावसाळी अधिवेशनात जाऊन दरवर्षी हजारो महिला सरकारला दारूबंदीची मागणी करतात. पण अजून बंदी होत नाही. ती व्हावी म्हणून महेश पवार सारखा तडफदार तरूण हजारो महिलांना या संकटातून वाचवण्यासाठी त्याच्या तरूण सहका-यांसोबत सक्षम नेतृत्व करतोय."