पुणे : डेक्कनवर राहणाऱ्या विलास लेले या ८० वर्षांच्या वृद्ध गृहस्थांनी गणेशोत्सवात वाजलेल्या डिजेंच्या विरोधात थेट उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश देवेंद्र कुमार उपाध्ये यांच्याकडेच तक्रार केली आहे. आळंदी ते पुणे पालखीत लाखो वारकरी २५ किलोमीटरचे अंतर १२ तासात शांततेत पार करून पुण्यात येतात तर, अवघ्या ३ किलोमीटर लक्ष्मी रस्त्याच्या अंतरासाठी ३० तासांचा ठणठणाठ कशासाठी असा प्रश्न लेले यांनी उपाध्येंना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
लेले डेक्कनला राहतात. ते ८० वर्षांचे आहेत. पुण्यात प्रत्येक सणवार तसेच दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती, आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती अशा प्रत्येक उत्सवीदिनी डॉल्बी सिस्टीम, लेझर लाईटचा वापर केला जातो. डॉल्बी सिस्टीमचा वापर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नाही. माणसाची आवाज सहन करण्याची क्षमता जास्तीत जास्त ८० डेसिबल पर्यंतच आहे. यावर्षी आवाजाची तीव्रता १३० डेसिबल इतकी भयानक होती. त्याचा अनेकांच्या मेंदूवर व हृदयावर विपरीत परिणाम झाला. काही जणांचा त्यात मृत्यूही झाला तर अनेकांच्या कानावर अतिशय वाईट परिणाम झालेला आहे, लेझर लाईटमुळे अनेकांना दृष्टिदोष निर्माण झाला आहे अशी सविस्तर भूमिका लेले यांनी व्यक्त केली आहे.
यंदा ३० तास ध्वनीप्रदुषणाचा त्रास-
राजकीय दबावामुळे पोलिस काहीही करत नाहीत. ते उत्सवाआधी बैठका घेतात, मात्र फक्त मंडळांच्या बड्या पदाधिकाऱ्यांना बोलावतात, शहरातील ज्येष्ठ नागरिक,मान्यवर व्यक्ती व्यापारी डॉक्टर्स,वकील व सामाजिक संस्था यांना या बैठकीत स्थान नसते. नोंदणीकृत मंडळाची संख्या ३ हजार तर कारवाई झालेल्या मंडळांची संख्या ८ अशी माहितीही लेले यांनी पत्रात न्यायाधिशांना दिली आहे. यंदाच्या मिरवणूकीत ८ हजार पोलिस अधिकारी व परिसरातील काही लाख नागरिक तब्बल ३० तास ध्वनीप्रदुषणाचा त्रास सहन करत होते. हे सगळे तुम्ही थांबवू शकता असे सुचवून लेले यांनी तुम्ही स्वत:हून यासंदर्भातील आपली याचिका दाखल करून घ्यावी अशी विनंतीही केली आहे.