सगळं सुरळीत झालं, आता तरी मंदिरांची दार उघडा
स्टार डमी ८२९
तन्मय ठोंबरे
पुणे : कोरोना महामारीमुळे असंख्य नागरिकांची श्रद्धास्थान असणारी मंदिरे, चर्च, मशीद तसेच बुद्धविहार इत्यादी धर्मस्थळे गेली दीड वर्षे बंद आहेत, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सरकारने टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, त्यात मंदिरे खुली करण्याचा अजिबात उल्लेखही केला नाही. त्यामुळे सरकार अजून किती दिवस देवाला कोंडून ठेवणार? असा प्रश्न भाविकांनी उपस्थित केला आहे.
गेल्या वर्षी मार्च २०२० पासून पुणे कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने त्याची तीव्रता पाहून या आजाराला महामारी घोषित केले. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी मंदिरेही बंद करण्यात आली. कोरोनाची पहिली लाट ओसरू लागल्यानंतर, सर्व काही खुले होण्यास परवानगी दिली. तेव्हा मंदिरांना थोडाफार दिलासा मिळाला होता. परंतु, आता दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यानंतर मंदिरे पुन्हा बंद करण्यात आली. मात्र, ही लाट ओसरल्यानंतरही मंदिर आणि भाविक यांच्यामध्ये असणारे सरकार बाजूला झालेले नाही.
शहरातल्या असंख्य धर्मस्थळांमध्ये शेकडो कामगार कार्यरत आहेत. पूजा साहित्य, फुल, नारळ, प्रसाद आदी पूजा साहित्य विक्री आणि उत्पादन-निर्मिती करणारी हजारो कुटुंबांचे पोटपाणी धर्मस्थळांवर अवलंबून आहे. त्यामुळे श्रद्धाळू भाविकांसह सर्वच जण मंदिरे उघडण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. “कोरोनाचे सर्व नियम पाळून मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी. तरच मंदिराशी निगडित ठप्प झालेले व्यवसाय पुन्हा सुरळीत होतील. भाविकांच्या श्रद्धेचाही सरकारने विचार करावा,” अशी मागणी नागरिक करत आहेत.
चौकट
“सरकारने सर्व उघडून दिले आहे. आता मंदिरेही खुली करावीत. आणखी किती दिवस बाप्पांना कोंडून ठेवणार आहात? सर्व काळजी घेऊनच भाविक मंदिरात जातील. सद्य:स्थितीत आम्ही पुजारी येऊन नियमित पूजा आणि अर्चना बंद मंदिरातच करतो आहोत.”
-सुनील कुलकर्णी, पुजारी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर
चौकट
“मंदिर बंद असल्याने कोणीही भाविक येत नाहीत. त्याचा फुले आणि नारळ विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. आमचा संपूर्ण व्यवसायच ठप्प झाला आहे. आर्थिक चणचण ओढवल्याने घराचे हप्ते देणेही कठीण झाले आहे. मंदिरे खुली झाल्याने आमच्या सारख्या छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत होईल.”
-संजय घोळवे, फुल-नारळ विक्रेते
चौकट
“मंदिर बंद असल्याने आमच्याकडे पूजा आणि आरतीचे साहित्य असेच पडून आहे. विक्री नसल्याने व्यवसायच पूर्णपणे लॉक झाला आहे. इतर वेळेस फोटो फ्रेम विक्री, आरती सामान व इतर वस्तू भाविक आवडीने घेत होते. पण सध्या कोणी फिरकत नाही त्यामुळे खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.”
-वरूण तावरे, आरती साहित्य आणि फोटो फ्रेम विक्रेता
चौकट
“आता तरी आम्हाला देवाजवळ जवळ जाऊ द्या. अजून किती दिवस दूर ठेवणार? आम्ही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच मंदिरात दर्शनासाठी जाऊ. सरकारने आमच्या श्रद्धांचे पालन आम्हाला करू द्यावे.”
-जया गलांडे, भाविक
चौकट
“मंदिरे बंद असली तरी घरोघरी पूजा, आरती चालू आहेत. खूप दिवस मंदिरे बंदच होती. नागरिक नियम पाळणार असतील तर सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी द्यायला काहीच हरकत नाही.”
-शहाजी बेंडकर, भाविक