दुर्गेश माेरे
पुणे : इंग्रजी माध्यमचे वाढलेले शुल्क आणि जिल्हा परिषद शाळांमधीलशिक्षणाची वाढलेली गुणवत्ता यामुळे पालकांचा ओढा जिल्हा परिषद शाळांकडे वाढला गेला आहे. नुकतेच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन महिना उलटला आहे; पण तरीही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्ह्यात किती विद्यार्थी आहेत हेच माहीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता इंग्रजी शाळांकडून मराठी शाळांकडे किती विद्यार्थी वळाले याचा शोध घेण्यासाठी तशी मोहीम राबवावी लागणार, अशी चर्चा जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे.
अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता वाढली आहे. त्यातच इंग्रजी माध्यमच्या शाळांनी फीवाढ केल्याने आपसूकच पालकांचा ओढा मराठी शाळांकडे वाढलेला दिसत आहे. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच शाळेची घंटा वाजली आहे. आर्थिक डबघाई हेदेखील मराठी शाळांकडे वाढलेल्या ओढ्याचे कारण असल्याचे नाकारता येणार नाही. मात्र, आता इंग्रजी माध्यमकडून जिल्हा परिषदच्या मराठी शाळांत नेमके किती विद्यार्थी आले, याची कोणतीही नोंद नसल्याचे समोर आले आहे. केवळ हेच विद्यार्थी नाही तर जिल्ह्यात किती विद्यार्थी आहेत, हेही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना माहीत नसल्याचे समोर आले आहे. गेल्या चार दिवसांपासून शिक्षणाधिकाऱ्यांकडून ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्यांना काहीच माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे ही जर माहिती उपलब्ध नसेल तर ही खूप मोठी गंंभीर बाब आहे. कारण अलीकडचे हे जग टेक्नोसॅव्ही झाले आहे. त्यामुळे प्रत्येक माहिती अपडेट करण्याची सुविधादेखील आहे; पण केवळ हलगर्जीपणातून हे राहिले असेल तर जिल्हा परिषदेला पुन्हा शाळांमध्ये सर्व्हे करण्याची नामुष्की ओढवणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदमध्ये सुरू झाली आहे.
शिक्षणाधिकारी तसे चांगलेच....
काही दिवसांपूर्वीच शिक्षणाधिकारी रुजू झाले असले तरी त्यांना पुणे जिल्हा काही नवीन नाही. कारण इथल्याच जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना त्यांनी ज्ञानाचे धडे दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळांचे मूळ दुखणे काय आहे हे त्यांना चांगलेच माहीत आहे; पण त्यापेक्षा आता शिक्षणाधिकारी म्हटल्यावर जिल्ह्यात किती विद्यार्थी आहेत हे माहीत नसणे म्हणजे खूपच झाले. जिल्ह्याचा कारभार सांभाळताना तितकी माहिती ठेवणे तरी गरजेचे आहे.
सीईओ साहेब.., आता तुम्हीच बघा !
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हे खूपच ॲटिव्ह. आतापर्यंत अनेक सीईओ येऊन गेले; पण इतके कार्यतत्पर सीईओ जिल्ह्याने कधी पाहिले नाही. त्यांची कामाची पद्धत तर निराळीच. प्रत्येक विभागातील कामांकडे त्यांचे बारीक लक्ष असते. मात्र, आता त्यांच्या नजरेतून हे कसं चुकलं हेच कळेना. आठवड्यातील दोन दिवस शिक्षणाधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ असते, त्यांच्या दालनाच्या बाहेर गर्दी होते. मात्र, त्यातून किती प्रश्न मार्गी लागतात यावरही आता सीईओंनी नजर टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.