नीरा :शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) नापास धोरणात बदल करून पाचवी आणि आठवी या इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा गेल्या शैक्षणिक वर्षात लागू करण्यात आली. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये राज्यभरात पाचवी आणि आठवी या इयत्तांमध्ये अनुत्तीर्ण होऊन पुन:प्रवेशित विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी शिक्षण आयुक्तालयाने मागवली आहे.इयत्ता पाचवीतील पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ३१ हजार ३८७ विद्यार्थ्यांना पैकी ३० हजार ६१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ६७३ पुन:परीक्षेस पात्र होते. शैक्षणिक वर्षात झालेल्या पुन:परीक्षेत ४५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यानंतरही २१५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने त्यांना त्याच वर्गात पुन्हा बसावे लागत आहे. पुणे जिल्ह्यातील खासगी विद्यालयातील ५५ हजार ८४५ विद्यार्थ्यांपैकी ५३ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार ६१३ पुन:परीक्षेस पात्र होते. शैक्षणिक वर्षात झालेल्या पुन:परीक्षेत १ हजार ६७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यानंतरही २४३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने त्यांना त्याच वर्गात पुन्हा बसावे लागत आहे, असे एकूण ८७ हजार २३२ विद्यार्थ्यांपैकी ४५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.इयत्ता आठवीतील पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ३३ हजार ८७३ विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार ३८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार ३ पुन:परीक्षेस पात्र होते. शैक्षणिक वर्षात झालेल्या पुन:परीक्षेत ८९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यानंतरही १५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने त्यांना त्याच वर्गात पुन्हा बसावे लागत आहे. पुणे जिल्ह्यातील खासगी विद्यालयातील ४६ हजार ७५१ विद्यार्थ्यांपैकी ४४ हजार ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २ हजार ३७९ पुन:परीक्षेस पात्र होते. शैक्षणिक वर्षात झालेल्या पुन:परीक्षेत २ हजार ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यानंतरही ३१२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने त्यांना त्याच वर्गात पुन्हा बसावे लागत आहे. असे एकूण ८० हजार ६२४ विद्यार्थ्यांपैकी ३२७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.या पार्श्वभूमीवर, शिक्षण आयुक्तालयातील शिक्षण उपसंचालक रजनी रावडे यांनी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतील समन्वय विभागाचे उपसंचालक यांच्याकडून पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांबाबतची जिल्हानिहाय माहिती मागितली होती. त्यात पाचवी आणि आठवीतील एकूण विद्यार्थी संख्या, पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या, पुनर्परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, पुन:परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या, त्याच वर्गात पुन:प्रवेशित विद्यार्थी संख्या तातडीने सादर करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.त्याच वर्गात प्रवेश -पाचवीतील ४५८ विद्यार्थी व आठवीतील ३२७ विद्यार्थी असे ७८५ विद्यार्थी या शैक्षणिक वर्षात त्याच वर्गात प्रवेश घ्यावा लागला आहे. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेचे शुल्क भरायचे, की शासनाकडून यांना काही देय लागेल हे अजून निश्चित नाही.
जिल्ह्यात पाचवी, आठवीत नापास विद्यार्थी किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 20:21 IST