लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फडणवीस सरकारने ११ गावे समाविष्ट केली तेव्हा किती हजार कोटी महापालिकेला दिले होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला. “ते काहीही बोलतात,” अशा शब्दात ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पाटील यांच्यावर टीका केली.
जगताप म्हणाले की, फडणवीस सरकारमध्ये पाटील महसूल मंत्री होते. गावांच्या समावेशाचे निर्णय घाईत घेतले जात नाहीत, हे त्यांना समाजयला हवे. पण बोलायचे म्हणून ते काहीही बोलतात. फडणवीस सरकारने ११ गावांचा निर्णय घेताना किती हजार कोटी दिले ते त्यांनी सांगावे.
“पुणे हे जन्मक्षेत्र नसले तरी आता आमदार या नात्याने आपले कार्यक्षेत्र आहे याचा त्यांंना विसर पडतो,” अशी टीका जगताप यांनी केली. कंत्राटदारांच्या हितासाठी भाजपा महापालिकेला पोखरत आहे, अन्यथा त्यांनी समावेश केलेल्या ११ व आताच्या २३ अशा ३४ गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी महापालिका सक्षम असल्याचे ते म्हणाले.