लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, पुणे- नाशिकसह अन्य राष्ट्रीय महामार्गांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. यापूर्वी देखील रखडलेल्या कामांचा आढावा घेतला, तरी प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. किती वेळा सांगायचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करा, अशा कडक शब्दांत गुरूवारी पुण्यात आढावा बैठकीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू असलेल्या पुण्यात पालखी मार्गांच्या कामाचा आढावा गडकरी यांनी एका खासगी हॉटेलमध्ये घेतला. पुणे विभागातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीचा गुरूवार (दि.26) रोजी पुण्यात आढावा घेतला. या बैठकीला नॅशनल हायवेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, एखादा प्रोजेक्ट काही कारणास्तव लांबला तर खर्चात वाढ होते. या दोन्ही मार्गांचे भूसंपादन तातडीने पूर्ण करा. गरज असल्यास अधिकाऱ्यांनी वेळोवळी बैठका घेऊन विषय मार्गी लावा. केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग विकासासाठी राज्याला विशेष प्राधान्य दिले आहे. मोठ्या प्रमाणात कामाांना सुरुवात झाली आहे. ही कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. परत परत सांगोतय काही अडचण असेल तत्काळ सांगा, मात्र कोणताही प्रकल्प रखडता कामा नये. पुणे-सातारा महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, दोन्ही पालखी मार्ग, चांदणी चौकातील ब्रीजचे काम तत्काळ मार्गी लावण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा.
पालखी मार्ग हा लोकांच्या श्रध्देचा विषय असल्यामुळे या कामाला निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प करा. केेंद्रशासनाने राष्ट्रीय महामार्गासाठी ऐंशी टक्के जमीन अधिग्रहित केल्यानंतर कामाला सुरुवात करावी हा नियम असल्यामुळे प्रत्येक महामार्गावर या नियमांच्या आधारे आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. केंद्रशासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.
------
भूसंपादनचे साडेपाचशे कोटींचे वाटप
जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्याकरिता जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत तब्बल साडेपाचशे कोटीं रुपयांचे वाटप पाच महिन्यांमध्ये केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गडकरी यांना दिली. राहिलेल्या प्रकल्पांचे ही तातडीने वाटप करण्याच्या सूचना गडकरी यांनी केल्या.