भारतीय अभिजात संगीत दरबारात अनेक प्रतिभावंत रत्न होऊन गेली. त्या-त्या रत्नांच्या विविध घराण्यांचा सांगीतिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी संबंधित घराण्यातील ज्या काही दिग्गज कलावंतांनी समर्थपणे खांद्यावर पेलली. त्यामध्ये लखनौ-शाहजहांपूर घराण्याचे शेवटचे खलिफा सरोद नवाज उस्ताद इरफान महम्मद खान यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. रबाब आणि सूर-सिंगार वाद्यशैलीमध्ये अलापाचे सादरीकरण ही त्यांच्या सरोद वादनाची खासियत. काबूल येथील अफगाण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक येथे ते सरोद आणि सतार शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पुण्यात त्यांची पहिल्यांदाच सरोदवादनाची सुश्राव्य आणि बहारदार मैफल पार पडली. त्यानिमित्त ‘लोकमत’ने साधलेल्या संवादात त्यांनी ‘संगीत’ हे मनोरंजन तर करतेच; पण तुमच्या मनात एखाद्या भावरसाची व्युत्पत्ती का होते? याचा विचार करायला देखील प्रवृत्त करते, हिच संगीताची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
नम्रता फडणीस-
* लखनौ -शाहजहांपूर घराण्याचा इतिहास काय?- आमचे पूर्वज हे अफगाणिस्तानावरून आले होते. जे बंगश होते. त्यातले एक घोड्याचे सौदागर, दुसरे मुघल लष्करात प्रमुख होते. ते सर्व रबाब वाजवित असतं. रबाबचा प्रामुख्याने लष्करी संगीतासाठी वापर केला जात असे. त्यामधील अब्दुल्ला खान यांनी भारतीय अभिजात संगीत शिकण्याचा विचार केला. ते मियॉं तानसेन यांचे पणतू बासतखान साहब यांच्याकडे गेले. रबाबवर भारतीय संगीत शिकायचे आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, या वाद्यावर हे संगीत शिकता येणार नाही, असे बासतखान साहेबांनी स्पष्ट केले. रबाबसारखे कुठलेतरी असे एखादे वाद्य पाहिजे या जिद्दीतून त्यांनी ‘सरोद’ची निर्मिती केली. बारा वर्षे शिकल्यानंतर अब्दुला खान लखनौला गेले. लखनौ घराणे प्रथम बुलंदशहर घराणे म्हणून ओळखले जायचे. लखनौमध्ये सर्व स्थायिक झाल्यावर हे घराणे लखनौ -शाहजहांपूर म्हणून प्रसिद्ध झाले.* तुम्ही तालीम कोणाकडून घेतली? या घराण्याच्या वादनाची वैशिष्ट्ये कोणती?- मी वडिल उमर खान आणि काका इलायस खान यांच्याकडे सरोद वादनाची तालीम घेतली. ‘रबाब’ शैलीतील वादन हेच या घराण्याचे वादन वैशिष्ट्यं. आम्ही सर्व रबाबियतकारांचे शिष्य आहोत. मियॉं तानसेन यांच्या घराण्यातील पुरूषांच्या बाजूचे सगळे रबाबियत तर मुलींच्या बाजूचे ‘बिन’ वादक आहेत. त्यामुळे लखनौवाल्यांना ‘रबाब’ची तर शहाजहांपूरवाल्यांना ‘बिन’ची तालीम मिळाली. दोन्ही घराणी एकत्र झाल्यामुळे आम्ही दोन्हींवर प्रभुत्व मिळविले. पारंपारिक पद्धतीने वादन हिच आमची खासियत आहे. आम्ही धून किंवा भटियाली वगैरे वाजवत नाही.* ‘रबाब’ आणि ‘बिन’ वादनामध्ये काय फरक आहे?- ‘बिन’मध्ये मिंड आहे जी ‘रबाब’मध्ये नाही. रबाबमध्ये ‘सूत’ आहे. सूत आणि मिंडमध्ये फरक आहे. मिंड घेताना मधले सूर देखील बोलले पाहिजेत. बिनमध्ये झाले, गमक, लहक, लडलपेट आहे. उलटा झाला, फोक झाला कशात आहे हे समजून-उमजून वादन केले जाते.* पारंपारिक पद्धतीने सरोदवादन नव्या पिढीला फारसे माहिती नाही, ते करून देणे किती आवश्यक वाटते?- नव्या पिढीला पारंपारिक सरोदवादन ऐकण्याची गरज वाटत नाही. ते सरोदवादनात जे कुणी प्रसिद्ध कलाकार आहेत त्यांनाच ऐकणे अधिक पसंत केले जाते. भारतात आजही कितीतरी असे जुने कलाकार आहेत. ज्यांनी पारंपारिक बाज जपला आहे. मात्र, त्यांना कुणी विचारत नाही. आमचं दुर्दैव आहे की ना शासन आम्हाला विचारते ना आयोजक.* बंदिशीची ठुमरी कशाला म्हटले जाते?- सुरूवातीला बंदिशीची ठुमरी असं काही नव्हतं. बहादूर हुसेन खान हे सरगम बांधायचे. त्यांचे शिष्य सनद पिया म्हणायचे की सरगमवर ठुमरीचे बोल ठेवू का? ते सरगमवर ठुमरीचे बोल बांधायचे. सरगम ही रागात बांधलेली असायची. त्यापासून ती बंदिशीची ठुमरी झाली. * वाद्यं अनेकदा कलाकाराशी बोलते असे म्हटले जाते. तुमच्याशी सरोद कशाप्रकारे संवाद साधते?- ‘सरोद’ ने हमे कितनी बार सताया, याचीच आधी आठवण येते. संगीत ही ‘ज्वेलस मिस्टेÑस’ आहे. जी आपल्याला वेगळे काम करू देत नाही. सरोदचा स्वभावच मुळात दु:खी आहे. मग, हसू तरी कसे येणार? स्वत: आनंदी नाही तर, दुसºयाला काय आनंद देणार? ‘संगीत’ हे मनोरंजन तर करतेच; पण तुमच्या मनात एखाद्या भावरसाची व्युत्पत्ती का होते? याचा विचार करायला देखील प्रवृत्त करते, हीच संगीताची ताकद आहे.* ‘सरोद’ आणि ’सतार’ मध्ये काय फरक आहे?- सतारचे बोल वेगळे आहेत. ‘सतार’मध्ये ‘दा’ आत आणि ‘सरोद’मध्ये तो बाहेर आहे. सरोदमध्ये पडदे नाहीत. सतारमध्ये मिंड आहे, जी सरोदमध्ये नाही. ताना, गतांमध्ये फरक आहे. आता गत सरळ झाली आहे. सरोद हे गंभीर स्वरूपाचं वाद्य आहे. ‘सरोद’ हा पुरूषी तर ‘सतार’ हा स्त्री साज आहे.* दोन वाद्यांच्या मिलाफातून तिसºया वाद्याची निर्मिती करण्याचा टेÑंड वाढत आहे, त्याविषयी काय वाटते?- आधी एक तरी वाद्य नीट वाजवता येऊ देतं. एका वाद्यावर प्रभुत्व मिळवल्याशिवाय दुसºया वाद्यावर लक्ष्य केंद्रित करायची घाई का?* गुरूकुल पद्धतीचे शिक्षण किती महत्वपूर्ण वाटते?- ‘गुरू ची सेवा करणं आणि साधना करणं हाच गुरूकुल पद्धतीचा उद्देश आहे. मात्र, भारतापेक्षा बाहेरच्या देशांमधील लोकांना गुरूकुल पद्धतीचे शिक्षण घेणे जास्त महत्वाचे वाटते. आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना वेळचं नाही अशी परिस्थिती आहे. काही वर्षांमध्ये अशी स्थिती असेल की परदेशातील लोकांकडून भारतीय अभिजात संगीत शिकावे लागेल. माझ्या मुलांनाही संगीत शिकवू शिकलो नाही, याची देखील खंत वाटते. संगीत मारून मुटकून श्किवता येत नाही.