लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाढत्या शहरीकरणात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी, मोकळ्या जागा निवासी क्षेत्र म्हणून आरक्षित झाल्या. परिणामी या भागातील बहुतांश विहिरीही काळाच्या ओघात बुजल्या. या विहिरींबरोबरच ओढे, नाले, ओहोळ यांसारखे नैसर्गिक जलस्त्रोतही शहरीकरणाच्या रेट्यात हरवून चालले आहेत. त्यामुळे शहराची तहान भागविण्यासाठी शहरालगतच्या धरणांव्यतिरिक्त पर्यायच उपलब्ध नाहीत. शहरात सध्या नेमक्या किती विहिरी, आड आणि अन्य जलस्त्रोत आहेत याची नेमकी माहिती नसल्याने महापालिकेने उशिरा का होईना हा सर्व तपशील गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या मध्यवर्ती भागातील पाणवठे-वाडे जमीनदोस्त होतानाच नाहीसे झाले. अनेक लहान-मोठे तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली बारीक झाले आहेत. उपनगरांमधील गावांची पाण्याची गरज भागविणाऱ्या जुन्या गाव-विहिरी नाहीशा झाल्या आहेत. अनेक ठिकाणी नाल्याचे प्रवाह बदलून अथवा बारीक करून त्या जागांवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, याचा फटका पुण्याने सप्टेंबर २०२० मध्ये आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे अनुभवला. उपनगरांमध्येही अनेक सोसायट्यांनी बेकायदेशीरपणे ओहोळ, ओढे बुजवले आहेत.
बाणेर-बावधन परिसरातून वाहणाऱ्या राम नदीचे अरुंद पात्र याचे उत्तम उदाहरण. शहरातील शेकडो ओढे, नालेही आज इतिहासजमा होऊ पाहत आहेत. त्यामुळे विहिरींसह शहरातले विविध नैसर्गिक जलस्त्रोत विकास आराखड्यात अधोरेखित होणे आणि त्यांचे जतन करणे भविष्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याचे मत पर्यावरणवादी व्यक्त करत आहेत.
चौकट :
विकास आराखड्यात नाही नोंद
“शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील गाव-विहिरी, मध्यवर्ती भागातील पाणवठे यांची कुठलीच नोंद आजतागायत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नाही. त्यामुळे या जलस्त्रोतांचा उल्लेख शहराच्या नकाशात अथवा विकास आराखड्यातही नियोजन करताना दिसून येत नाही.”
कोट १ :
“शहर विकास करताना चारपदरी, दोनपदरी रस्त्यांचे नियोजन करण्यात येते. पण हे नियोजन करतानाच वाढत्या काँक्रिटीकरणात आपण जलमार्ग करणेही जरुरी आहे. नदी सुधार योजनेमध्ये आलेला निधी काही प्रमाणात जलस्त्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी वापरला पाहिजे. शहराच्या विकास आराखड्यात जलस्त्रोत आरेखित करून त्यांचे संरक्षण होणे आवश्यक आहे.”
-शैलेंद्र पटेल, अध्यक्ष, जलदेवता सेवा अभियाऩ
चौकट २
माहिती संकलनाचे आदेश
“शहरातील मोठ्या विहिरी व विविध जलस्त्रोतांची माहिती संकलित करण्याच्या सूचना प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना तसेच विभागातील अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. याची नोंदही शहर नियोजन आराखड्यात अधोरेखित करण्यात येईल,” असे महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
-------
फोटो : विहिरींचा संग्रहित फोटो घेणे.