पुणे : मधमाशी मध गोळा करण्याचे काम किती वेळ करते, तिची क्षमता किती यासह या मधमाश्यांचे विश्वच कॅमेऱ्याच्या साहाय्याने उलगडण्यास मदत होणार आहे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागात कार्यरत प्रा. डॉ. राधाकृष्ण पंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘मधमाशी पालन’ या विषयात संशोधन करीत ‘स्मार्ट हनिकोंब मॉनिटरिंग डिव्हाइस’ बनविले आहे. यासाठी केंद्र सरकारने त्यांना नुकतेच स्वामित्व हक्क (पेटंट) देखील जाहीर केले आहेत. डॉ. पंडित यांनी प्राध्यापक डॉ. विक्रम काकुळते आणि डॉ. बाळासाहेब टपले यांच्या मदतीने हे उपकरण बनवले आहे.
डॉ. पंडित म्हणाले, ‘स्मार्ट हनिकोंब मॉनिटरिंग डिव्हाइस’ हे उपकरण म्हणजे एक मधमाश्यांची पेटी असून, यामध्ये चार किंवा आवश्यकतेनुसार कॅमेरे आहेत. सोबत चित्रीकरण साठवण्याची सोयही आहे. मधमाशी पालन करताना त्याचे निरीक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होणार आहे. त्यातून पुढे आणखी संशोधन करता येईल. शेतकऱ्यांच्या शेतात ते लावल्यास उत्पन्नही वाढेल.
उपकरणाचे महत्त्व
मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाश्यांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळेच मधमाश्यांचे संगोपन हे पेट्यांमध्ये करून त्याद्वारे शास्त्रीय पद्धतीने मध गोळा करणे योग्य मानले जाते. मधमाश्या या परागीकरण सिंचनाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते. अशा प्रकारचे उपकरण शेतात ठेवल्यास शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढते. मधमाश्यांचे शत्रूपासून रक्षण करीत त्यांची संख्या वाढविण्याचा दृष्टीने हे उपकरण महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
काेण आहेत डाॅ. पंडित?
डॉ. राधाकृष्ण पंडित यांना एकूण २९ वर्षांंचा अध्यापन व संशोधनाचा अनुभव आहे. त्यांनी बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला असून, त्यांचा याबाबत शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. ते विद्यापीठाच्या अधिसभेचेही सदस्य आहेत.