पुणे - काश्मीर असो किंवा चीन, हे प्रश्न राजकीय किंवा धार्मिक मुद्यांवर सोडवता येणे शक्य नाही. कारण या प्रश्नांचा थेट संबंध हा लष्कराशी असल्याने त्यामागचे वास्तव समजून घेतले पाहिजे. पंडित नेहरूंना आपल्या लष्कराच्या स्थितीची जाणीव होती. हे प्रश्न युद्धाने सुटणार नाहीत याची देखील त्यांना पूर्णपणे कल्पना होती म्हणूनच त्यांनी शरणागती न पत्करता काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला, तो एक धोरणाचा भाग होता. यावरून त्यांच्यावर टीका केली जात असली तरी काश्मीर प्रश्नाबाबत नेहरूंना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत आणि ‘लोकमत’चे नागपूर आवृतीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.देशाचे नेतृत्व करणारे मग ते नेहरू किंवा नरेंद्र मोदी असोत, देशाचे दुबळेपण सांगू शकत नाहीत. ‘आम्ही तयार आहोत’ असेच सांगावे लागते, त्यामागचे लष्कराचे वास्तव जाणून घ्यायला हवे असेही ते म्हणाले. साधना साप्ताहिकाच्या वतीने यदुनाथ थत्ते स्मृती व्याख्यानमालेंतर्गत ‘नेहरू : देशाचे पंतप्रधान’ या विषयावर ते बोलत होते. साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.द्वादशीवार म्हणाले, पंडित नेहरूंना पंतप्रधानपदाची कारकीर्द ही एकटेपणानेच सुरू करावी लागली. नेहरू समाजावादाची बीजे रोवू पाहात होते, मात्र त्यांना जयप्रकाश नारायण यांनी विरोध दर्शविला. भांडवलदारांच्या मदतीने नेहरू समाजवाद आणि फॅसिझम आणू पाहात आहेत अशी टीका करणारे पत्र त्यांनी लिहिले. मात्र नेहरूंना गरीब-श्रीमंत ही विषमता दूर करणारा समाजवाद रुजवायचा होता. दरम्यान सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी भूमिका मांडली होती. मात्र ही भूमिका पंडितजींना मान्य नव्हती. सरतेशेवटी पटेलांनाच काही काळानंतर संघावर बंदी घालावी लागली.देशाला कम्युनिस्टांपासून नव्हेतर धर्मांधांपासून धोका आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते. अशा प्रकारे नेहरूंना त्यांच्या प्रवासात स्वकीयांविरुद्धच अनेकदा संघर्ष करावा लागला, कठोर निर्णयही घ्यावे लागले. गांधीजींचा वध ही घटना नेहरू आणि पटेल यांचे मनोमिलन घडविणारी ठरली. त्यांच्यात मतभेद होते पण कटूता नव्हती. त्यांना जोडणारा पूल हे गांधीजी होते. गांधीजी आणि पटेल यांच्यानंतर नेहरूंनी देशाचे एकाकी नेतृत्व केले. अणुऊर्जा केंद्र, शैक्षणिक संस्था, क्षेपणास्त्र अशा अनेक गोष्टींची मुहूर्तमेढ रोवली.
काश्मीरप्रश्नी नेहरू जबाबदार कसे? - सुरेश द्वादशीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 1:16 AM