---------
कोरोनाने घटवले उत्पन्न: कर्जहप्ता भरण्याची भेडसावते चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: हॉटेलसाठी कर्ज काढले होते, कोरोनाने टाळेबंदी लादली. चांगले सुरू असलेले हॉटेल बंद ठेवावे लागले, कर्जाचे हप्ते थकले, बँक मागे लागली आहे. त्यामुळे आता करायचे काय ? असा प्रश्न कर्जदारांना सतावत आहे.
कोरोनाच्या महिनाभर आधीच मालासाठी कर्ज घेतले. माल आला, पेमेंट केले आणि टाळेबंदी सुरू झाली. सगळा माल खराब झाला. कर्जाचे हप्ते देता येईना, मालही विकता येईना अशी स्थिती आहे. सारख्या नोटिसा येत आहेत.
नोकरी मिळाली,लग्न झाले, फ्लँट घेतला. मोठे कर्ज काढले. पगार चांगला असल्याने हप्त्यांची काळजी नव्हती. पण कोरोना आला. दोन चार महिन्यातच नोकरी गेली. पगार बंद झाला. हप्ते थकले. बँक बहुधा आता घरावर जप्ती आणणार असे दिसते आहे.
पहिले उदाहरण हॉटेलचालकाचे, दुसरे एका व्यापार्याचे तर तिसरे आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याचे. असे फक्त पुण्यातच लाखापेक्षा जास्त कर्जदार आहेत. अनेकांची हॉटेल बंद झाली, दुकान बंद करावे लागले व नोकरी कितीजणांची गेली याची गणतीच नाही.
ज्या बळावर कर्ज काढण्याचे धाडस केले ते ऊत्पन्नच राहिले नाही. पण कर्ज कायम राहिले. त्याचे हप्ते व्याजासह वाढतच राहिले. यातून बाहेर कसे पडायचे, हा आर्थिक अडचणीचा चक्रव्युह भेदायचा तरी कसा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. काहीजण धडाडी दाखवत बाहेर पडतात तर काही खचून जात स्वतःचे, कुंटुबाचेही बरंवाईट करून घेतात.
कर्ज देणाऱ्या बँकांना या स्थितीशी काहीही देणेघेणे नाही. सर्व बँकांची कर्जदारांची एकत्रित नोंदही नाही, प्रत्येक बँक आपापल्या कर्जदारांना नोटिसा पाठवून हप्ता जमा करण्याचा तगादा लावत आहे, फार हप्ते थकले तर जप्तीसारखी कारवाईचा करत आहे. बँकाकडून किमान नोटिसांसारखी कायदेशीर कारवाई तरी होते, खासगी वित्तीय कंपन्या, तर गुंडांनाच वसुली अधिकारी बनवून वसुली करत आहे.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात रिझर्व्ह बँकेने ३ महिने वसुली करू नका असा आदेश काढला. त्यात पुन्हा ३ महिने वाढ केली. कोरोनाने बिघडलेली आर्थिक स्थिती आहे तशीच आहे, सवलत मात्र बंद झाली. त्यामुळे वसुलीसाठी सर्वच बँका हिरिरीने पुढे झाल्यात.
नोटिसा पाठवून, कारवाया करून कर्जदारांचे मानसिक स्वास्थ्य घालवत आहेत.