मंचर ग्रामपंचायत कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राजगुरू म्हणाल्या, आम्ही कार्यभार हाती घेऊन पाच महिने झाले आहे. आम्ही सूत्रे हाती घेतली तेव्हा ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती दयनीय होती. कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांचे पगार थकले होते. पाणी पुरवठा योजना वीज बिल व इतर देणे असे एकूण चार कोटी 66 लक्ष रुपयांची देणी बाकी होती. तरीही आम्ही न डगमगता कामाला सुरुवात केली. थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी नियोजन केले. मात्र मागील आठ दिवसांपासून काहींनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर खोटेनाटे आरोप करून ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे वस्तुस्थिती जनतेपुढे येणे गरजेचे आहे.
सन 2017-18 मध्ये अंगणवाडी दुरुस्ती व नवीन बांधकामासाठी सुमारे 24 लाख 90 हजार रुपये जमा झाले. हा निधी येवूनही त्यावेळी खर्च झालेला नाही. तो निधी इतरत्र खर्च करण्यात आला. नवीन नळ पाणीपुरवठा योजना 2018 मध्ये सुरू झाली. 37 महिने होऊनही काम चालूच आहे. कामाची मुदत अठरा महिने असताना आता दुप्पट कालावधी होत आला आहे. या उशिराला आम्ही जबाबदार कसे असा सवाल करून सरपंच राजगुरू म्हणाल्या ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये या कामाची वर्कऑर्डर, इस्टिमेट, सर्व प्लॅन हे कागदपत्र आम्हाला मिळाले नाही. महिन्यापूर्वी आम्ही ते संबंधितांकडून मागून घेतले आहे.
अडीच वर्षांपूर्वी शहरात एक कोटी रुपये खर्च करून विद्युतीकरण करण्यात आले. त्यातील पथदिवे व हायमास्ट दिवे निकृष्ट दर्जाचे असल्याने शहरातील 50 टक्के दिवे लागत नाही. त्याला आम्ही जबाबदार नाही. सफाई कर्मचाऱ्यांचे ठरलेले पगार वेळोवेळी करत असून शहर सुंदर ठेवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत आहोत. याशिवाय मागील पाच वर्षांच्या कालखंडातील ताळेबंद पाहिला असता ग्रामनिधी, 14 वा वित्त आयोग आणि इतर अनुदान यामध्ये जमाखर्चाचा हिशोब जुळत नाही. अनेक त्रुटी आढळतात. आम्ही प्रशासनाकडे विशेष लेखापरीक्षकाची मागणी करत आहोत. मागील लेखापरीक्षण यामध्ये अनेक शेरे मारले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपसरपंच युवराज बाणखेले म्हणाले, ग्रामस्थांनी वेळोवेळी कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. यातूनच विकास कामे मार्गी लागतील. या पत्रकार परिषदेला उपसरपंच युवराज बाणखेले, सदस्य सविता क्षीरसागर, रंजना शेटे, कैलास गांजाळे, सतीश बाणखेले, विशाल मोरडे, ज्योती निघोट, ज्योती थोरात, माणिक गावडे, दीपाली थोरात आदी उपस्थित होते.