पुणे: राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने तयार करावा, यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला असला तरी सतरा नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना अनेक अडचणी येणार असल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे. तसेच, दहावीत कोणतेही अंतर्गत मूल्यमापन झालेले नसताना आमचा निकाल कसा तयार केला जाणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता दहावीच्या निकालाचीसाठी मूल्यांकन पद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यात नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्याबाबत संबंधित विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी ते नववी या कालावधीमध्ये मिळवलेल्या गुणांची टक्केवारी इयत्ता दहावीचा निकालासाठी घेतली जाणार आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांकडे त्यांचे इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतचे गुणपत्रक उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या जुन्या नोंदणी संबंधित शाळेकडून मागविण्यास बराच कालावधी जाणार आहे. परिणामी, १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना या निकालाबाबत शाळांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
पुण्यासह अनेक ठिकाणी खासगी क्लास (शिकवणी)चालकांकडून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. या क्लास चालकांनी काही शाळांबरोबर अलिखित करार केले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या निकालाची जबाबदारी शाळा घेणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खासगी क्लास चालकांनी आमच्या ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या आहेत, त्याचआधारे आमचा निकाल जाहीर केला जाईल ,असा चुकीचा समज बहुतेक विद्यार्थ्यांनी करून घेतला आहे.
-----------
सतरा नंबरचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळांमार्फत काही प्रकल्प लिहून घेतले जातात. तसेच संबंधित विद्यार्थ्यांची अंतर्गत (तोंडी) परीक्षा घेतली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे काहीच घेता आले नाही. तसेच इयत्ता नववीमध्ये नापास झाल्याने सतरा नंबरचा अर्ज भरला. आता नववीप्रमाणे आम्ही दहावीतही नापास होणार का ? असा संभ्रम काही विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
------------------
इयत्ता दहावीत १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यासाठी पाचवी ते नववीपर्यंतच्या गुणांची टक्केवारी आवश्यक आहे. ही टक्केवारी मिळविण्यासाठी शिक्षकांना व शाळा प्रशासनाला अनेक अडचणी येणार आहेत. तसेच आमचा निकाल कसा लावला जाणार, याबद्दल १७ नंबरचा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
- अविनाश ताकवले, माजी प्राचार्य
-----------------
मी एका खासगी क्लासमधून इयत्ता दहावीच्या परीक्षेचा १७ नंबरचा अर्ज भरला आहे. क्लासने घेतलेल्या परीक्षेच्या आधारावर आमचा निकाल जाहीर करतील, असे आम्हाला वाटते. त्याचप्रमाणे कोणत्याही परीक्षा दिल्या नाहीत तर आमचा निकाल कसा प्रसिद्ध करणार ? इयत्ता नववीत माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले नव्हते. त्याचा परिणाम दहावीच्या निकालावर होणार आहे का ? याबाबत संभ्रम आहे.
- मयूर जाधव, विद्यार्थी