पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस राहिले आहेत. एकूण पाच लाख पस्तीस हजार मतदार आहेत. त्यांच्यापर्यंत अवघ्या ४८ तासांत पोहचायचे कसे? असा प्रश्न ६२ उमेदवारांसमोर आहे. रात्र थोडी आणि मत मागायचे सोंग करायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे प्रत्येकाकडून सोशल मीडियाचा वापर खुबीने केला जात आहे.
प्रचारासाठी मोबाईल ॲप, व्हॉट्सअप, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदान स्लिपचे वाटप करण्यात येत आहे. मतदान केंद्र कुठे आहे हे शोधण्याची लिंक पाठविण्यात येत आहेत. पुणे मतदारसंघात सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण भौगोलिक अंतर आणि प्रचारासाठी उपलब्ध कालावधी पाहता प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचणे अशक्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, भाजप व इतर पक्षांच्या उमेदवारांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.
प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदारांना फोन करून निवडणुकीची माहिती देत आहेत. एका मतदाराला दिवसातून तीन ते चार वेळा फोन केला जातो. त्याचबरोबर आपल्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्याचे काल रेकॉर्डिंग पाठवून उमेदवाराला पसंती क्रमांक १ देण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर मतदारांचे मतदान केंद्र कुठे आहे. मतदान केंद्रापर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले जाते. आपल्या पक्षाचा उमेदवार कसा योग्य आहे. हे पटवून दिले जात आहे. काही राजकीय नेत्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. त्यांच्या माध्यमातूनदेखील मतदारांना फोन केल्या जात आहेत. त्यासाठी त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे नंबर मिळवून संपर्क केला जातोय.
कोरोनाच्या काळात होणारी ही राज्यातील पहिली निवडणूक आहे. कोरोनामुळे पूर्वीसारखा प्रचार करण्यास काही बंधने आली आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा खुबीने वापर होत आहे. कोरोनामुळे कमी मतदान होण्याची शक्यता असल्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क करून, त्यांचे मतदान करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सार्वत्रिक निवडणुकीसारखीच शहरात पोस्टरबाजी-
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात सर्वच उमेदवारांनी मोठ मोठे प्रचाराचे पोस्टर लावले आहेत. शहराच्या मुख्य चौकात हे पोस्टर लावण्यात आले आहेत.
पती-पत्नीचे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदान-
पती अणि पत्नीचे नावे वेगवगळ्या मतदान केंद्रांवर आहेत. पत्नीचे मतदान पिंपरीतील शाळेत तर, पतीचे मतदान भोसरीतील शाळेत आहे.