पुणे : जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. कोरोनाची लाट रोखण्यासाठी लस हा एकच पर्याय असताना लसीकरणाला गती मिळणे आवश्यक आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर अँटिबॉडी मोठ्या प्रमाणात विकसित होतात आणि कोरोनाच्या तीव्र संसर्गाचे, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जिल्ह्यात दुस-या डोसला प्राधान्य देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्ह्यात आजवर केवळ २१ टक्के नागरिकांनाच दुसरा डोस मिळाला आहे. दुसरा डोस मिळालेल्या नागरिकांची संख्या १८,२६,९७२ इतकी आहे.
लसीच्या पहिल्या डोसनंतर दोन ते चार आठवड्यांनी शरीरात अँटिबॉडी विकसित व्हायला सुरुवात होते. दुसरा डोस शरीरातील अँटिबॉडी विकसित करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करतो. त्यामुळे दुस-या डोसला बुस्टर डोसही म्हटले जाते. पहिल्या डोसनंतर कोरोनापासून १५-२० टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळते, तर दुस-या डोसनंतर ८० टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना दोन्ही डोस मिळणे आवश्यक ठरत आहे. लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने लसीकरणात वारंवार अडचणी निर्माण होत आहेत.
पुणे ग्रामीणमध्ये आतापर्यंत ४९ टक्के लोकांना पहिला, २१ टक्के लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. पुणे शहरामध्ये ७८ टक्के नागरिकांना पहिला, तर २५ टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ६० टक्के नागरिकांना पहिला, तर २१ टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. जानेवारी महिन्यात आरोग्य कर्मचा-यांच्या लसीकरणाला सुरुवात होऊनही केवळ ६० टक्के कर्मचा-यांना दुसरा डोस पूर्ण झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील ६४ टक्के कर्मचा-यांचा, १८ ते ४४ वयोगटातील ३ टक्के, ४५-५९ वर्षे वयोगटातील ३८ टक्के, तर ६० वर्षांवरील ४८ टक्के ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.
------------------------
लाभार्थी दुसरा डोसटक्केवारी
आरोग्य कर्मचारी१,९८,३१९ १,१८,६६९ ६०
अत्यावश्यक कर्मचारी२,८३,३७७ १,८२,७०१ ६४
१८-४४ वयोगट४८,२६,०७४ १,६१,७६९३
४५ ते ५९ वयोगट१९,३०,६१४ ७,३६,६६८ ३८
६० वर्षांवरील नागरिक१३,००,३२२ ६,२७,१६५ ४८