गेल्या वीस वर्षांमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागात आमूलाग्र बदल झाला व यामध्ये संगणक व तत्सम गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात व कामात सर्वांत महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणून आहेत. पण, हे सर्व होत असताना गेल्या काही वर्षांमध्ये या तंत्रज्ञानाचे वापरकर्त्यांमध्ये कित्येक पटीने वाढ झालेले आहे. याच्या अतिवापराचे परिणाम म्हणून काही शारीरिक व्याधींची सुरुवात झाली. जसे की डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, पाठदुखी, चष्माचा नंबर वाढणे या सर्व लक्षणांना आपण एक आजारामध्ये वर्णन करू शकतो. तो म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सॅन्ड्रॉम (cvs). सीव्हीएस म्हणजे फक्त संगणामुळे होणारा आजार नसून अशा प्रकारची प्रत्येक उपकरणे जसे की, मोबाईल, टॅब, लॅपटॉप. यामध्ये जी लक्षणे दिसून येतात. मुख्यत्वे लक्षणे ही डोळ्यांची असतात.
- डोळ्यांतून सारखे पाणी येणे
- डोळे लाल होणे
- डोळ्यांची जळजळ/रखरख होणे
- डोळे कोरडे पडणे
-दृष्टी कमी होणे
- चष्म्याचा नंबर वाढणे
तसेच डोळ्यांच्या व्यतिरिक्त पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखी, हातापायांच्या स्नायूवर येणारा ताण या प्रकारची लक्षणे देखील पाहिली जातात.
सद्य:परिस्थितीमध्ये तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. मग आपण या लक्षणांसाठी काय इलाज करावा किंवा याबाबतीत आपण कोणती काळजी घ्यावी?
- वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी व चष्मा नंबरचा असल्यास त्याचा वापर चालू करावा.
- रुग्णांना डोळे कोरडे पडणे यांचा त्रास असतो. त्यांना lubricating eye drops चालू करावे लागतात.
- contact lens मुळे होणाऱ्या त्रासाला काही antibiotics व lubricating eye drops ची गरज भासते.
रुग्णांनी घ्यावयाची काळजी ही मुख्यत्वे दोनमध्ये विभागणी करता येते.
- वैयक्तिक बदल व कामाच्या ठिकाणी करावयाचे बदल.
वैयक्तिक बदल -
- ऑनलाइन स्कूलमध्ये मुले शिकत असताना, शक्यतो अभ्यासाच्या सत्रांची योग्य विभागणी करण्यात यावी, जेणे करून मुलांचा स्क्रीन टाइम कमी होईल.
- शक्यतो अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना मोबाईल, टॅब न देता मैदानी खेळात त्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करावे. हे मैदानी खेळ मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतात.
- जे लोक हे संगणकावर तासन्तास काम करतात. त्यांनी स्क्रीन समोर कसे बसावे व किती अंतर ठेवावे? हे खाली चित्रात आहे. यामध्ये आपण पाहू शकता की आपण स्क्रीन समोर ताठ बसावे. स्क्रीनची उंची ही डोळ्यांसमोर असावी व त्यामध्ये २ फुटांचे अंतर असावे.
- २०-२०-२० या सूत्राची आपण नियमित सवय करावी. यामध्ये स्क्रीन वीस मिनीट वापरानंतर वीस फूट वीस सेकंद पाहावे.
- पुरेशी झोप. पौष्टिक अन्न व वेळच्या वेळी जेवण, नियमित योगासने व व्यायाम याची सवय करावी.
कामाच्या ठिकाणी करावयाचे बदल -
- सतत स्क्रीनवर काम करताना सभोवतील प्रकाश हा चांगला असावा.
- स्क्रीनचा उजेड व सभोवतील उजेड यामध्ये फरक नसावा
- थेट एसी समोर बसू नये जेणेकरून डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढेल.
वरील सर्व गोष्टींची आपण खबरदारी घेतल्यास आपणास डोळ्यांची योग्य निगा घेता येते. तरी डोळ्यांबाबत कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. सतीश शितोळे