पुणे: पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिकेने शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले हाेते. मुख्यमंत्री शहरात येणार म्हटल्यावर या कामाला अधिक वेग आला हाेता; पण अशास्त्रीय पद्धतीने बुजविलेले हे खड्डे दाेनच दिवसांत वाहून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुन्हा रस्त्यांची चाळण झाल्याने खड्डे दुरुस्तीवर झालेले लाखाे रुपये खड्ड्यात बुडाले आहेत. महापालिकेच्या या अजब कारभाराबाबत प्रश्न उपस्थित हाेत आहे.
शहरात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर पाणी साचून खड्डे पडले हाेते. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे दुचाकी चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. शहरातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होताहेत. काही जखमींना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, काही कायमचे जायबंदी झाले आहेत. त्यातच शहरात ड्रेनेज आणि जलवाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई केली होती. त्यावर पॅचवर्कचे काम करण्यात आले होते. हे पॅचवर्कदेखील रस्त्याशी एकरूप झाले नाही. रस्ते खोदाई नंतरच्या वरवरच्या मलमपट्टीने रस्ते उघडले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने युद्ध पातळीवर सुरू केले आहे. महापालिकेच्या पथ विभागाने रस्ते दुरुस्तीचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू केले आहे, तसेच चेंबर दुरुस्तीची कामे आणि पावसाचे पाणी साठलेल्या ठिकाणी निचरा करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. पण या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे.
पाणी साचल्याने पडतात सर्वाधिक खड्डे
पाण्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि रस्त्यात खड्डे पडतात. आपल्याकडे रस्त्यावरील पावसाळी वाहिन्या तुंबलेल्या असतात त्यामुळे रस्त्यावरून पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे शहरांमध्ये खड्डे पडण्याचे प्रमाण हे जास्त आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर पावसाळी गटारे नसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे या रस्त्यावर सर्वाधिक खड्डे पडत आहेत.
पुणे महापालिका शास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजवत नाही. या कामात इंडियन रोड काँग्रेसचे निकष पाळले जात नाही. शहरात सिमेंट आणि डांबरी असे दाेन्ही प्रकारचे रस्ते आहेत. सर्वाधिक खड्डे डांबरी रस्त्यावर पडत आहेत. सदर खड्डे बुजविताना त्यांची रुंदी आणि खोली पाहणे आवश्यक आहे. ज्या रस्त्यावर खड्ड्यांची संख्या जास्त आहे, तिथे डांबरीकरणाचा लेअर टाकला पाहिजे. खड्डे बुजविताना जुना रस्ता आणि नवीन टाकलेले मटरेल यांची एकत्रित जुळणी होत नाहीत. त्यामुळे बुजविलेले खड्डे फारकाळ टिकत नाही. एकदा खड्डा बुजविल्याने तो पुन्हा पडला नाही पाहिजे, अशा दृष्टीने काम होत नाही. या कामाच्या दर्जावर नियंत्रण ठेवले जात नाही. बुजवलेला खड्डा हा किमान वर्षभर तरी पुन्हा पडला नाही पाहिजे. - प्रा. भालचंद्र बिराजदार, सीओईपी, सिव्हिल विभाग
इंडियन रोड काँग्रेसने दिलेल्या निकषाप्रमाणे तंतोतंत खड्डे दुरुस्ती करता येणार नाही. इंडियन रोड काँग्रेसच्या निकषाप्रमाणे खड्डे दुरुस्ती करण्यासाठी संबंधित भाग एक दिवस बंद ठेवावा लागेल. त्यामुळे वाहतूककोंडी होईल. यात नागरिकांची गैरसाेय हाेणार नाही आणि इंडियन रोड काँग्रेसचे अधिकाधिक निकष पाळले जाईल, या दृष्टीने महापालिका प्रयत्न करत आहे. - साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका
शहरभर खड्डे, तरीही पालिका म्हणते खड्ड्यांचा फाेटाे पाठवा
पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिकेकडून शनिवारी रात्रीपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अपवाद वगळता शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झालेली आहे. तरीही साेईस्कररीत्या त्याकडे दुर्लक्ष करत महापालिकेचा पथ विभाग नागरिकांनाच खड्ड्यांचा फाेटाे पाठवण्यास सांगत आहे. मुख्यत: काँक्रिटच्या (सिमेंट) माध्यमातून खड्डे बुजविण्यात आले आहेत. पॅचवर्कसाठीही काँक्रिट वापरले आहे. अनेक खड्डे व पॅचवर्क हे डांबरी मालाच्या मदतीने बुजविण्यात आले, तर ज्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, तो पूर्ण रस्ताच रिसर्फेसिंग केला जाणार आहे. खड्ड्यांसंदर्भातील माहिती कळविल्यानंतर त्यावर पथ विभागाला योग्य कार्यवाही करता यावी, यासाठी नागरिकांनी दूरध्वनी क्र. ०२०-२५५०१०८३ व मो. ९०४३२७१००३ (व्हॉट्सॲप) या हेल्पलाइनवर संपर्क क्रमाक, असे आवाहन पुणे महापालिकेच्या पथ विभागाने केले आहे.