- प्रज्वल रामटेके
पुणे : शहरातील वाढती रहदारी पाहता हॉर्न न वाजवता गाडी चालवणे तसे अशक्य वाटते. त्यामुळे पुण्यामध्ये दररोज एक कोटी वेळा हॉर्न वाजवला जातो; पण हाॅर्न न वाजवताही सुरक्षित प्रवास करता येतो, हेच एका अवलियाने कृतीतून सिद्ध केले आहे. देवेंद्र पाठक असे या अवलियाचे नाव.
कर्णकर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या पुणेकरांनी पाठक यांचा आदर्श काही अंशी स्वीकारला तरी पुण्यातील ध्वनी प्रदूषण कमी हाेण्यास नक्कीच हातभार लागेल. पाठक यांनी गाडी चालवताना ४ वर्षांत एकदाही हॉर्न वाजवला नाही. याची नाेंद घेत पाेलिसांनीही त्यांचा गाैरव केला. अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या ‘नो हाॅंकिंग डे’च्या पार्श्वभूमीवर तरी पुणेकर नाहक हाॅर्न वाजवणे टाळतील, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लाेकसंख्येपेक्षा वाहनेच अधिक :
पुणे हे एकमेव असे शहर आहे जिथे वाहनांची संख्या शहरातील लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. प्रत्येकाने वारंवार कर्णकर्कश हॉर्न वाजवले तर ध्वनी प्रदूषण काेणत्या पातळीवर जाईल याचा विचारही करू शकत नाही. वाढत्या ध्वनी प्रदूषणात हॉर्नचा आवाज हाही एक प्रमुख कारण ठरत आहे. ध्वनी प्रदूषणातूनही अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा वेळी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
आजारांचा वाढला धाेका :
ध्वनी प्रदूषण असेच वाढत राहिले तर पुणेकरांना उच्च रक्तदाब, हृदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा सामना करावा लागेल. ज्याचे धाेके काहींना बसलेदेखील. शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी ‘नो हॉर्न प्लीज’ असे फलक असतात. पण आपण त्यांना विशेष गांभीर्याने घेत नाही.
तुम्हीच करा विचार...
पुण्यात साधारणतः चाळीस ते पन्नास लाख वाहने आहेत. यातील केवळ दहा लाख वाहने रस्त्यावर आहेत असा विचार केला आणि प्रत्येकाने किमान दहा वेळा हाॅर्न वाजविला तरी हा आकडा काेटीच्या पुढे जाताे. यातील १० टक्के हॉर्न अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास ट्राफिकमध्ये असतात आणि कर्णकर्कश हॉर्नमुळे त्यांना आराेग्याच्या विविध दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.
काय कराल?
- नो हाॅंकिंग डे अर्थात ‘हॉर्न ठेवा एक दिवस बंद’ अशी संकल्पना पुण्यात राबविण्यात येणार आहे. लाईफ सेव्हिंग फाउंडेशन, पुणे पोलिस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकात मंगळवारी (दि. १२) सकाळी ९ वाजता नो हाॅंकिंग डे पार पडणार आहे. विविध आयटी कंपन्या, हॉटेल्स, मॉल्स, पीएमपी बस, विविध सामाजिक संघटना, सोसायटी यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले जात आहे. त्याला याेगदान देणे आवश्यक आहे.
हॉर्नच्या अतिवापराने हाेते काय?
- ऐकायला कमी येणे, कानात बेल वाजत राहिल्यासारखा आवाज येणे, झोपेत सतत बिघाड होणे, अस्वस्थता वाटणे, वेदना होणे अथवा थकवा येणे, कामाच्या ठिकाणी काम करण्याची इच्छा कमी होणे, बोलण्यात अडथळा येणे, हार्मोन्समध्ये बदल होणे, रस्त्यावर अचानक वाजविल्या जाणाऱ्या हॉर्नमुळे अन्य वाहनधारक विचलित होतात. यातून अपघात घडण्याचा धोकाही संभवतो.
ज्येष्ठ नागरिकांसह पोलिसांनाही हाेताेय त्रास :
वय वाढले की प्रतिकारक्षमता कमी होत जाते. त्यातच वाहतूक कोंडी नित्याची झालेली. मग कर्णकर्कश, जास्त डेसिबलचे हॉर्न सतत कानावर पडल्यास ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागताे. तसेच सिग्नलवर ८-१० तास थांबून वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागताे. त्यामुळे चिडचिडेपणा, नैराश्य, व्यसनाधीनता वाढणे आणि बहिरेपणा येण्याचा धाेका आहे.
नो हाॅंकिंग मॅन इन पुणे :
पुणे शहरात जून २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत ५० हजार किलोमीटर प्रवास केला; पण एकदाही हॉर्न वाजवला नाही, असे देवेंद्र पाठक अभिमानाने सांगतात. त्यांच्या या कृतीची नाेंद घेत पोलिस प्रशासनातर्फे पुण्याचे माजी सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते गाैरव करण्यात आला. यात त्यांना ‘नो हाॅंकिंग मॅन इन पुणे’ हा पुरस्कार देण्यात आला.
भारतातच असेही एक शहर :
एकीकडे पुणे शहरात रोज एक कोटी वेळा हॉर्न वाजवले जातात; परंतु मिझोरामची राजधानी ऐझॉल इथे मात्र हॉर्न वाजवलाच जात नाही. हे भारतातील एकमेव शहर आहे. यानंतरचे दुसरे शहर पुणे बनावे यासाठी पोलिस प्रशासन, आरटीओ, सामाजिक संघटना यांनी एकत्र मिळून प्रयत्न केल्यास हे शक्य आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
वाहनांच्या हाॅर्नचा कर्णकर्कश आवाज आणि सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या दुचाकींच्या आवाजामुळे बहिरेपणा येतो. ट्रकसह चारचाकी वाहनांचे हॉर्न जादा डेसिबलचे असतात. त्यांच्या आवाजाने बहिरेपणाच्या रुग्णांत वाढ होत आहे. अनावश्यक हॉर्न वाजविल्याने ध्वनीप्रदूषणातही भर पडते.
- डॉ. मिलिंद भोई, कान-नाक-घसा तज्ज्ञ