पुणे : गेल्या चार महिन्यांपासून किराण्यासह गॅस, कडधान्ये यांचे भाव सातत्याने वाढतच आहेत. दुसरीकडे हाताला काम मिळत नाही. मिळालेच तर त्याबदल्यात मिळणारा माेबदलाही तुटपुंजा आहे. अशावेळी सामान्यांनी जगायचं कसं, असा प्रश्न अनेकजण उपस्थित करीत आहेत. आमचा आवाज सरकारपर्यंत जाईना, प्रश्न काेणी मांडेना अन् सरकार दखल घेईना, अशी अवस्था झाल्याचे अगदी नाेकरदारापासून शेतकरी, वेठबिगारीपर्यंत सर्वच मांडत आहेत.
गरिबाघरची भाकरीही ताटातून कधीचीच गायब झाली आहे. गहू, बाजरी, ज्वारी यांचे दर प्रतिकिलो ७ ते १५ रुपयांनी वाढले आहेत. तूर, मसूर, मूग, हरभरा या डाळींचे दरही ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत. इतकेच काय तर तेलाच्या भावात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. पगार मात्र तेवढाच आहे.
अशी एकही खाण्याची किंवा वापरण्याची वस्तू नाही ज्यामध्ये वाढ हाेत नाही. मग आपाेआपच घर खर्चाचे बजेट वाढत चालले आहे. या महागाईचा फटका जास्त प्रमाणात गृहिणींना बसला आहे. यात मिरची पावडर, मसाले यांच्याही भावात वाढ झाली आहे. लाल तिखट मिरची प्रतिकिलो ३५० ते ५०० रुपयांपर्यंत गेली आहे. यात रोजच्या वापरायच्या वस्तूंच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे.
ज्वारी ५० ते ६० रुपयांवर
पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. पेरणी उशिरा सुरू झाली आहे. त्यामुळे नवीन पीक येण्यास वेळ लागणार आहे. ज्वारी, गहू, बाजरी महाग झाली आहे. सध्या ज्वारीचा भाव ४५ वरून ६० रुपयांवर गेली आहे. गहू ३५ ते ५५ रुपयांपर्यंत आहे. बाजरी ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो झाली आहे.
घरगुती गॅस सिलिंडर १०५५ रुपयांवर
घरगुती गॅस सिलिंडर १०५५ रूपयांवर पोहोचला आहे. त्यामध्ये दर काही कमी झाले नाहीत. त्यात अनुदानही जमा होत नसल्याने सामान्यांचे महागाईने कंबरडे मोडत आहे.
कांदा ५०, तर बटाटा ४० रुपयांवर
परतीच्या पावसामुळे कांदा खराब झाला आहे. त्यामुळे कांदा कमी प्रमाणात येत आहे. ताे घाऊकमध्ये ३० रुपये, तर किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये विक्री सुरू आहे. घाऊक बाजारात बटाटा २५ ते ३० रुपये, तर किरकोळमध्ये ४० रुपये इतका आहे.
...तरीही परवडेना
गेल्या चार महिन्यांपासून पालेभाज्यांचे दर वाढतच आहेत. सध्या भाज्यांची आवक वाढली असल्याने सध्या भाव थोडेफार घसरले आहेत. ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी वाढत्या महागाईने परवडत नाही.
''अवेळी पडणाऱ्या पावसामुळे यंदा पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी पीक डोळ्यासमोर ठेवूनच लागवड करीत असतो. तोपर्यंत शिल्लक साठा बाजारात पाठवत नाही. यामुळे गेल्या वीस दिवसांतच ज्वारी, गहू, बाजरीत १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन माल डिसेंबरमध्ये आल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता आहे. - अभय संचेती, व्यापारी''