लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुख्यात गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या सर्मथकांनी कारागृहाच्या आवारात तसेच बाहेर मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला. फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच कारागृहाच्या आवारातून गाडीत बसून गजानन मारणे बाहेर आला. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक भायखला यांच्याकडे ही चौकशी सोपविण्यात आली असल्याचे रामानंद यांनी सांगितले.
गजानन मारणे याची सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी त्याचे शेकडो समर्थक गाड्या तळोजा कारागृहाबाहेर जमले होते. त्यातील काही गाड्या तळोजा कारागृहाच्या आतमध्ये गेल्या होत्या. समर्थकांच्या गाड्यांसह गजानन मारणे हा कारागृहाच्या आवारातून मिरवणुकीने बाहेर आला. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शेकडो गाड्यांतून मिरवणुकीने हा ताफा पुण्याकडे आला होता.
गजानन मारणे याच्या गाड्या कारागृहाच्या आवारात कशा गेल्या. त्यांना कोणी परवानगी दिली होती. कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. त्यांना वेळीच कोणी अटकाव का केला गेला नाही, असे अनेक प्रश्न त्यानिमित्ताने समोर आले आहेत. याची चौकशी करण्याचे आदेश भायखला विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिले असल्याचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह प्रमुख सुनील रामानंद यांनी सांगितले.