डॉ. रघुनाथ माशेलकर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ''''''''अटल संस्कृती गौरव'''''''' पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “शिक्षकांना समाजात पूर्वीसारखी प्रतिष्ठा मिळायला हवी, असे अटलजींना नेहमी वाटायचे. सध्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचा मी अध्यक्ष आहे. त्यात शिक्षकांना प्रतिष्ठा देण्यावर भर देण्यात येणार आहे. शिक्षकाना प्रतिष्ठा मिळाली नाही तर देश कसा घडणार,” असा प्रश्न ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी उपस्थित केला.
संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त यंदाचा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. माशेलकर यांना शुक्रवारी (दि. २५) प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, सिद्धार्थ शिरोळे, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, वैशाली माशेलकर, ‘संवाद’चे सुनील महाजन आदी यावेळी उपस्थित होते.
माशेलकर म्हणाले, “सीएसआरला लौकिक मिळण्याचे संपूर्ण श्रेय अटलजींना जाते. परिवर्तन करताना कठीण निर्णय घ्यावे लागतात आणि त्याला राजकीय पाठिंबा लागतो. अटलजींनी केवळ पाठिंबाच नाही, तर संपूर्ण स्वातंत्र्य दिले. आजपर्यंत १७ माशेलकर समित्या स्थापन झाल्या. सरकार अडचणीत असते, तेव्हा माशेलकर समिती स्थापन करते, असे अटलजी म्हणाले होते. पोखरण येथील अणूचाचणीनंतर भारताला खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानातील स्वातंत्र्य मिळाले. ११ मे हा तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित करण्याचा निर्णयही अटलजींचाच होता.”
मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.
चौकट
गीत नया गाता हूँ...
अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम यावेळी झाला. ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी यात अटलबिहारी वाजपेयी यांच्या कविता सादर केल्या. अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी नृत्य सादर केले.
चौकट
“शेतकऱ्याला आता शेतमालाच्या थेट विक्रीचा अधिकार मिळाला आहे. कोणत्याही आडत्याशिवाय त्यांना जगभरातील बाजारपेठ खुली झाली आहे. तरुणांनी सुरू केलेल्या स्टार्ट-अपमुळे हे शक्य झाले. या धोरणाचे श्रेय डॉ. माशेलकर सरांना जाते.”
- देवेंद्र फडणवीस