पुणे : कोण दुकानात काम करत तर कोणी डिलिव्हरी बॉय म्हणून... पण प्रत्येकातला समान धागा म्हणजे शिक्षणाची ओढ.पुण्यातल्या पूना नाईट हायस्कुल संस्थेचा बारावीचा निकाल 86 टक्के लागला आहे.या शाळेजवळच असणाऱ्या तुळशीबागेतील कॉस्मेटिकच्या दुकानात काम करून आकाश धिंडले याने 79 टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला. आकाश हा वेल्हे तालुक्यातील घिसरगावचा रहिवाशी आहे. दहावीत 81 टक्के गुण मिळवल्यानंतर त्याने पुण्यातील पुना नाईट हायस्कुल येथे प्रवेश घेतला आणि कॉस्मेटीकच्या दुकानात काम करून अभ्यास करत या रात्रशाळेत प्रथम येण्याचा पराक्रम केला.दिवसभर दुकानात काम करून तो संध्याकाळी 6.30 वाजता शाळेत जात असे.घिसरगावात त्याचे आई वडील उदरनिर्वाहासाठी शेती करतात.त्याला पुढे सीएस करण्याची ईच्छा आहे.आयुष्यात पुढे जायचे असेल तर शिक्षणाला पर्याय नाही असे त्याला वाटते.त्याकरिता पुढेही कामासोबत शिक्षण सुरू ठेवण्याचा त्याचा निर्धार आहे.
याच शाळेत 75.23 टक्के मिळवत विठ्ठल बसवेश्वर ईश्वरकट्टी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. 10वीत एका विषयात नापास झाल्यावर सुमारे 11 वर्ष त्यांचा शिक्षणाशी संबंध तुटला होता. लहान बहिणीच्या प्रेरणेने त्यांनी पुन्हा शिक्षणाला प्रारंभ केला. ते सर्जिकल स्टोअरमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. यादरम्यान 2015 मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यामुळे विठ्ठल ईश्वरकट्टी यांचा हुरूप आणखी वाढला आणि ते बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली असून पत्नीने खूप मदत केल्याचे ते आवर्जून सांगतात.
पुना नाईट हायस्कुलचे प्राचार्य अविनाश ताकवले म्हणाले, यावर्षी आमच्या रात्रशाळेत 120 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यातील 104 विद्यार्थी पास झाले आहेत.यावर्षी आतापर्यंतचा सर्वोच्च 86 टक्के निकाल लागला आहे.सर्वसाधारण शाळेपेक्षा रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे शेड्युल्ड वेगळे असते. आपल्याला शिक्षण घ्यायचे आणि कुटूंबाला हातभार लावायचा या हेतूने हे विद्यार्थी या ठिकाणी आलेले असतात.