पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची (hsc exam) परीक्षा घेतली जात आहे. त्यात इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नाची सूचनाच प्रिंट झाली नाही. त्यामुळे (Q1 A5 i) हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना एक गुण फुकट मिळणार आहे.
राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवारी सुरू करण्यात आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पहिल्या प्रश्नातील हा प्रश्न सोडविण्याबाबत सूचना प्रिंट झाली नाही. त्यामुळे प्रश्न सोडविण्याबाबत काही विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. राज्य मंडळाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर अभ्यास मंडळ सदस्य आणि मुख्य नियामक यांच्या संयुक्त सभेमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली. त्यात ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना एक गुण देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
व्याकरणाचे अनेक प्रकार असतात. त्यानुसार स्वतंत्र प्रकारासाठी एका-एका गुणासाठी स्वतंत्र प्रश्न विचारणे अपेक्षित होते. परंतु, याबाबत सूचना प्रिंट न केल्यामुळे विद्यार्थ्यांना एक गुण दिला जाणार आहे. शुक्रवारी इंग्रजी विषयाची परीक्षा घेण्यात आली. त्यात राज्यातील एकूण ३० विद्यार्थ्यांवर परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यात अमरावती विभागात सर्वाधिक २६ विद्यार्थ्यांवर तर नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि लातूर विभागात प्रत्येकी एका विद्यार्थ्यावर कारवाई केली आहे.