लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दक्षिणेकडून येत असलेल्या वाऱ्यांमुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांची अडविलेली वाट बुधवारी काहीशी कमकुवत झाल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी राज्यात प्रवेश केला आहे. त्याचा परिणाम नव्या वर्षात यंदा प्रथमच किमान तापमान सरासरीच्या तुलनेत घटलेले दिसून येत आहे. पुण्यात संपूर्ण जानेवारी महिन्यात किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत वाढलेले दिसून आले. त्याचप्रमाणे अनेक शहरात यंदा प्रथमच तापमान घसरले आहे. तापमानात घट होत असल्याची जाणीव मंगळवारी सायंकाळनंतरच जाणवू लागली होती.
राज्यातील सर्वच भागात आज किमान तापमानाचा पारा घसरला आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश शहरातील तापमानात घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ आहे. विदर्भाच्या अनेक भागात किमान तापमानात मोठी घट झाली आहे.
दिवसा व रात्रीच्या तापमानातील ही घट किमान दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १०.७, लोहगाव १३.४, सांताक्रुझ १८.६, मुंबई २१,अलिबाग १४.९, डहाणू १८.७, रत्नागिरी १९.२, सोलापूर १४.१, कोल्हापूर १७.३, उस्मानाबाद १४.४, सांगली १५.९, नाशिक ११.३, मालेगाव १३.२, परभणी ११.९, नांदेड १३, जालना १४.९, बीड १६.३, औरंगाबाद १२.६, जळगाव १०.२, सातारा १२.९, बारामती ११.६, मालेगाव १३.२, जेऊर ११, अकोला १२.४, अमरावती १३.५, बुलडाणा १५.५, ब्रम्हपुरी १०.६, चंद्रपूर ११.८, गडचिरोली १०, गोंदिया १०, नागपूर १०.७, वर्धा ११.६, यवतमाळ १२.
---
पुण्यात आणखी पारा घसरणार
गेले काही दिवस दिवसा व रात्रीच्या तापमानात वाढ जाणवत होती. मंगळवारी सायंकाळनंतर थंड वारे वाहू लागून वातावरणात बदल झाल्याचे जाणवू लागले. रात्री बोचरे वारे वाहत होते. बुधवारी सकाळी पुण्यात १०.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील चार दिवस दिवसा व रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पहाटे मोठ्या प्रमाणावर धुके पडण्याची शक्यता आहे. किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.