पुणे : पुण्यात कडाक्याची थंडी पडली असून पुणेकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. हवेतील गारठा वाढल्याने पुण्यातील किमान तापमान ७ अंशावर आले आहे. यंदाच्या हंगामातील हे निचांकी तापमान असल्याची माहिती हवामान खात्याचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
पुण्यात बुधवारी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आज तर एनडीए, हवेलीमध्ये ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पहायला मिळत आहे. हे या हंगामातील निचांकी तापमान नोंदले गेले आहे. सध्या उत्तरेकडील किमान तापमान खूप घसरले आहे. थंड हवेचा झोत महाराष्ट्राकडे येत आहेत. त्यामुळे इथेही थंडी जाणवत आहे. दिवसभरही थंडी कायम राहत असल्याने पुणेकर स्वेटर घालून घराबाहेर पडत आहेत. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठून गेला आहे. परिणामी राज्याच्या किमान तापमानात मोठी घट झालेली आहे. किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली घसरला असून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. तसेच विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. गुरूवारी आज (दि. २५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
शहरातील किमान तापमान
एनडीए : ७.६हवेली : ७.८ शिरूर : ७.४ शिवाजीनगर: ८.६ हडपसर : १२.२ कोरेगाव पार्क: १४.०