चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कंपन्यांची संख्या मोठी आहे. या कंपन्यांमधून महिन्याला करोडो रुपयांचे भंगार ( स्क्रॅप ) निघते आहे. यासाठी ठेकेदार, कंपनीचे अधिकारी गुंड प्रवृत्तीच्या राजकारणी पुढाऱ्यांना हाताशी धरून भंगार मिळवण्यासाठी अनेकदा चोऱ्याही घडवल्या जात आहेत. यातील काही तक्रारी पोलीस ठाण्यात जातात तर काही जातच नाहीत. यामुळे अशांचे फावत असल्याने असे गुन्हे वारंवार घडत आहे. औद्योगिक वसाहतीमधील चाकण, वासुली, आंबेठाण, म्हाळुंगे व खालुब्रे आदी गावांमध्ये भंगार विकत घेणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी आपली दुकानदारी थाटली आहे.यातील काहींनी टोळ्या तयार करून कंपन्यांमधील भंगार चोऱ्या केल्या जात आहेत. यामध्ये ठेकेदार, कंपनीतील वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा रक्षक,नेते, कार्यकर्ते व काही पोलिसही यात सहभागी असल्याचे वास्तव आहे.
महाळुंगे पोलिसांनी भंगार माफियांच्या प्रचंड विस्तारलेल्या जाळ्याभोवती फास आवळले असून यातील दोन प्रमुख म्होरक्यांवर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर अनेक नावे व पडद्यामागील चेहरे पुढे येत आहे. तर गुन्हा दाखल झालेल्या दोघांमध्ये चाकणमधील एक बडा भंगार व्यावसायिक आणि एका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवक महिलेचा पतीचाही यात समावेश आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात स्क्रॅप व लोखंडी तुकड्यांचे भंगार खूप मोठ्या प्रमाणात निघते. त्यामुळे कारखान्यातून भंगार खरेदी करण्यासाठी भंगार व्यावसायिकांची चढाओढ सुरू असते. त्यावरून अनेक रक्तरंजित वाद झाल्याचे सर्वश्रुत आहे. धक्कादायक म्हणजे आता या भंगाराच्या धंद्यात चक्क बडे राजकारणी उतरले असल्याची बाब समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या मंडळींना कोट्यवधी रुपयांची महिन्याला उलाढाल असलेल्या भंगाराच्या धंद्यात रस निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील काळात प्रशासनाच्या मदतीने सध्याची मंडळी पद्धतशीरपणे बाजूला करून या बड्या-बड्या राजकारणी मंडळींचा दबदबा या धंद्यात वाढणार आहे. राजकारणातील ही बडी मंडळी भंगारासाठी वाकडी वाट करीत असून पडद्याआडून भागीदारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
---------------------------------------------------------