पुणे : उशिरा का होईना पावसाने पुण्यात चांगलीच सुरुवात केली आहे. त्यामुळे वीकेंडला वर्षा सहलीसाठी पुणेकरांनी लाडके पर्यटनस्थळ असलेल्या सिंहगडावर जाण्यासाठी मोठी गर्दी केली. मात्र, सिंहगड रस्त्यावर राजाराम ब्रिजपासूनच उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे तासाभराचा वेळ खर्च करावा लागत आहेत, तर पुढे गडावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे गडावर कार घेऊन जाणाऱ्यांनाही ऐन डोंगरावर वाहतूक कोंडीत अर्धा-एक तास अडकून पडावे लागल्याचे चित्र आहे.
वर्षा सहलीसाठी पुणेकरांचा सर्वांत आवडीचा आणि सरावाचा परिसर म्हणजे सिंहगड. जाताना किंवा येताना मध्येच वाटेत लागणारा खडकवासल्याचा मस्त प्रवास आणि गडावर मिळणारे पिठलं भाकरी, गरामगरम भज्जी यामुळे गडावर जाण्यासाठी पुणेकरांची गर्दी झाली आहे. गडावर घाटच्या रस्त्यावरून जाताना काही बेशिस्त पर्यटकांचा उपद्रवामुळे गडावरील वाहतूक दुपारनंतर वारंवार ठप्प झाली होती. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी असलेल्या वनविभागाच्या चेकपोस्ट नाक्यापासून गडावर गाड्या सोडणे बंद केले गेले. सुमारे तास-तासभर वाहने अडवून ठेवल्यामुळे उशिराने आलेल्या पर्यटकांना माघारी फिरावे लागले, तर काही जणांना तासभर वाट पाहून दुपारी दोननंतर गडावर पोहोचावे लागले व सायंकाळ होण्याच्या आधीच लवकर निघावे लागले.
''आम्ही सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीवरून सिंहगडावरला निघालो. वाटेत कारच्या रांगाच रांगा होत्या. दुचाकी असल्यामुळे कारच्या शेजारून हळूहळू गडावर जावे लागले. पायथ्यापासून गडावर पोहोचण्यासाठीच आम्हाला सुमारे दीड तासांपेक्षा अधिक वेळ लागला. एरव्ही आम्ही केवळ अर्धा ते पाऊण तासात पोहोचतो. - सचिन शिर्के, पर्यटक''