पुणे : शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात बुधवारी सकाळपासूनच मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. सर्वत्र सकाळी गर्दी पहायला मिळाली. मतदान प्रक्रिया शांततेमध्ये सुरू होते. कसब्यात चार तासांमध्ये सर्वाधिक १८.३३ टक्के मतदान झाले.
उत्साही मतदारांनी सकाळी ऊन वाढण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यास प्राधान्य दिले. कसब्यात नूमवी शाळा, आरसीएम स्कूल, भारत स्कूल आदी ठिकाणी रांगा लागल्या होत्या. पहिल्या दोन तासांमध्ये ७.४४ टक्के मतदान झाले.
नारायण पेठेतील वा. ब. गोगटे प्रशालेत ३१ क्रमांकाचे मशीन काहीवेळ बंद पडले होते. पण नंतर ते सुरू झाले. मॉक पोलिंग नंतर अड्रेस टॅग व्यवस्थित न बांधले गेल्याने ते बंद पडले होते. ते परत व्यवस्थित केल्याने मतदान प्रक्रिया ७ वाजून २० मिनिटांनी सुरू झाली.कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी पत्नीसमवेत थोरले बाजीराव पथावरील नूतन मराठी विद्यालयात मतदान केले. तसेच प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी बुधवार पेठ येथील नूतन समर्थ विद्यालयात कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. तर नारायण पेठेतील कन्याशाळा येथे ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करण्यासाठी रांग लावली.
जिल्ह्यात पहिल्या चार तासात १५.६४ टक्के मतदानमतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशातून पत्र्या मारुती मित्र मंडळ आणि विजय मित्र मंडळाच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मतदानाची शाई दाखविणाऱ्या नागरिकांसाठी सुदाम्याचे पोहे न्याहरी म्हणून देण्यात आले. साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे मतदान करणाऱ्या मतदारांना पुस्तक भेट देण्यात आले. तसेच कसबा गणपतीतर्फे चहा आणि क्रीमरोल वाटप केले.