अवसरी (पुणे) : इंदोरेवाडी भोरवाडी- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे गॅस सिलेंडरच्या झालेल्या भीषण स्फोटात ठाकर समाजाच्या पाच झोपड्याची राखरांगोळी झाली. संसारउपयोगी वस्तू जळून गेल्याने कुटुंब उघड्यावर पडली आहेत. गुरुवारी (दि.१७) ही घटना घडली. सुदैवाने कुटुंबातील लोक धामणी येथे खंडोबाच्या दर्शनाला गेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शिंदेमळा येथील पोलीस पाटील दत्ता शिंदे यांनी दिली.
आगीमध्ये कोंबड्या, किराणामाल, धान्याची पोती, शेंगांची पोती, कपडे, सोन्याचांदीचे दागिने, भांडी, इलेक्ट्रिक वस्तू, शेती अवजारे जळून गेली आहेत. सिलेंडरचा काही भाग वाऱ्याच्या वेगाने उडून ९०० फुट अंतरावर जाऊन पडला होता. ही घटना कळल्यानंतर पोलीस पाटील दत्ता शिंदे, अनिल शिंदे,शंकर बांगर ग्रामस्थ मदतीसाठी तेथे गेले पण तोपर्यंत जळून खाक झाले होते. नवनाथ वामन केदारी, सचिन वामन केदारी, भाऊसाहेब भगवान केदारी, प्रकाश संजय मधे, राहुल भाऊसाहेब केदारी यांच्या झोपड्या जळाल्या आहेत.
कामगार तलाठी शशांक चौदंते, ग्रामसेवक जे. डी शिदोरे, अवसरी खुर्दचे पोलीस पाटील संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सचिन ढोणे यांनी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस पाटील दत्ता शिंदे यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आगीचे कारण समजले नाही. कळंब येथील साक्षी एच.पी गॅस एजन्सीचे मालक बाळाशिराम भालेराव यांनी घटनास्थळी भेट दिली. या कुटुंबाना योग्य मदत करू, असे त्यांनी सांगितले.