पुणे : गणेश पेठ, दुधभट्टी जवळील एका वाड्याला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग अधिकच भडकली. अग्निशमन दलाच्या ७ फायरगाड्या व जवानांच्या मदतीने आग विझवण्यास एक तासाचा कालावधी लागला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दूधभट्टी जवळील बाजूस असलेल्या वाड्याला पावणेचार च्या सुमारास आग लागली. या वाड्यात चार कुटुंब राहात होती. आग लागल्याचा कॉल येताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मात्र १५० मीटर आत असलेल्या वाड्यापाशी गाडी जात नसल्याने जवानांनी १५ हॉल्ट सोडून पाण्याचा पाईप आतपर्यंत नेला. वाड्यात गेल्यानंतर जवानांसमोरच गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराची पूर्ण एक भिंत पडली. आगीची तीव्रता अधिक असल्याने धनकवडी, कोंढवा बुद्रुक येथून गाड्या मागवाव्या लागल्या. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असावी. वाड्यातील संपूर्ण जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रभारी अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितले.