पुणे: सातारा रस्त्यावरील सिटी प्राइड थिएटरच्या शेजारी शीतल हॉटेलला सकाळी साधारण ८.४५ वाजता भीषण आग लागली. या घटनेची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी चंद्रकांत पवार यांनी अग्नीशमन दलाला फोन वरून दिली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या मुख्य केंद्रातून २ गाड्या व कात्रज केंद्रातून १ गाडी अशा तीन आग विझवण्याचे बंब तसेच दोन देवदुत गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्नीशमन दलाचे प्रभारी अधिकारी सचिन मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने आग विझवली.
ही आग इतकी भीषण होती की हॉटेलचे शटर आतील उष्णतेमुळे उघडत नव्हते. अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कटरच्या साह्याने शटर उचकटून आत जावे लागले. परंतु हॉटेलमधील सर्व सामान जळून खाक झाला होता. तसेच आतमध्ये प्रचंड धूर झाल्याने दलाच्या कर्मचाऱ्यांना एक्सोट ब्लोवर च्या साहाय्याने धूर काढावा लागला. त्यानंतर आतमध्ये पाण्याचा मारा करत आग विझवण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आतमधील गॅसच्या टाक्या देखील सुरक्षित बाहेर काढण्यात आल्या.
हॉटेलची इमारत संपूर्णपणे व्यावसायिक असल्याने शेजारीच असलेल्या दुकाना देखील या आगीमुळे नुकसान झाले. या हॉटेलच्या वरील मजल्यावर असलेले ऑनलाईन किचन मुळे ही आग लागल्याची प्रथम दर्शनी माहिती हॉटेलचे मालक यशव नाथ शेट्टी यांनी सांगितली.