- विक्रम मोरे
पुणे: पुण्यातील कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली आहे. शेकडो दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या भागात अतिशय अरुंद जागा आहे. त्यात दाटीवाटीनं दुकानं आहेत. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. रस्ते अतिशय लहान असल्यानं अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत शिरताना अडथळे येत आहेत. सध्या घटनास्थळी पुणे महापालिकेसह पीएमआरडीएचे कर्मचारी पोहोचले आहेत. पुण्यातील फॅशन स्ट्रीटला रात्री ११ च्या सुमारास भीषण आग लागली. हा परिसर अतिशय दाटीवाटीचा असून इथे शेकडो दुकानं आहेत. आग मोठी असल्यानं अग्निशमन दलाचे आणखी बंब घटनास्थळी बोलावण्यात आले आहेत. रस्ते अतिशय अरुंद असल्यानं आगीपर्यंत पोहोचणं अवघड जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुकानं असल्यामुळे व्यापारीवर्ग आणि आजूबाजूला राहणाऱ्या बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली आहे. त्यांना हटवण्याचं काम पोलिसांना करावं लागत आहे. या आगीमध्ये नेमकी किती दुकानं भस्मसात झाली, आग कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पुणे शहरातला अत्यंत जुना भाग म्हणून एमजीरोड ओळखला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीसाठी फॅशन स्ट्रीटवर कायम गर्दी असते.आगीत काही कोटी रुपयांचं नुकसान झालं असून आत जाण्यासाठी मार्ग नसल्यानं मोहम्मद रफी चौक, मोती बिल्डिंगची गल्ली आणि फॅशन स्ट्रीटच्या बाहेर अग्निशमन दलाच्या गाड्या थांबवत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फॅशन स्ट्रीटच्या सभोवताली, मोती बिल्डिंग, एम जी रोडवरील घरं, शहजहानंद अपार्टमेंट, समृद्दी अपार्टमेंट येथे मोठी लोकवस्ती आहे. त्यांनादेखील मोठ्या प्रमाणात आगीच्या झळा बसल्या आहेत.कँटॉनमेंट परिसरात वर्षभरात चौथ्यांदा अशा प्रकारची घटना घडली आहे. गेल्या वर्षी कँटॉनमेंटच्या आयसीयूमध्ये आग लागली होती. महिन्याभरापूर्वीच चिल्ड्रन वॉर्डला आग लागली होती. १६ मार्चला कॅम्पमधीलच शिवाजी मार्केटला आग लागल्याची घटना घडली. २०१७ मध्ये मुंबईतल्या कमला मिल कंपाऊंडमध्ये एका पबमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. त्यानंतर २०१८ मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनं फायर ऑडिट केलं. त्यात फॅशन स्ट्रीटचा उल्लेख धोकादायक असा करण्यात आला होता. इथली जवळपास सर्व दुकानं अनधिकृत असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.