बिबवेवाडी : गंगाधाम रस्त्यावरील आईमाता मंदिरालगत असलेल्या कुशन पॅलेस नावाच्या सोफा बनवणाऱ्या कारखान्याला दुपारी २ ते २.३०च्या सुमारास अचानक लागली. ही आग कारखान्याला लागूनच असलेल्या भंगार सामानाच्या गोदामालाही लागल्यामुळे किरकोळ आगीचे रूपांतर भीषण आगीमध्ये झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन केंद्रातून ५ आगीचे बंब, ३ पाण्याचे टँकर, ४ आपत्ती व्यवस्थापनाच्या देवदूत गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत एक तासाने नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सोफा बनवण्यासाठी लागणारे कापड, फोम, लाकूड व भंगार सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कारखान्यात व भंगार सामानाच्या गोदामात काम करणाऱ्या कामगारांच्या ४ दुचाकींना आग लागल्यामुळे नुकसान झाले.आग इतकी भीषण होती की आग व धुराचा लोळ परिसर लांबपर्यंत दिसत होते. कारखान्याला लागलेल्या आगीची झळ शेजारीच असलेल्या आईमाता मंदिराच्या फायबरच्या शेडला बसून सर्व फायबरचे शेड वितळून खाली ओघळले होते.मग नेमेचि येतो उन्हाळाबिबवेवाडीच्या या परिसरात शहराची बाजारपेठ असून याला लागूनच अनेक झोपडपट्ट्या असून येथे दरवर्षीच्या उन्हाळ्यात आग लागण्याच्या दुर्घटना घडत आल्या आहेत. परंतु प्रशासन अशा दुर्घटनेनंतर कोणतीही ठोस उपाययोजना राबवत नाही. याच रस्त्यावर गेली कित्येक वर्षे अग्निशमन दलाचे केंद्र बांधून तयार आहे. परंतु अजूनही हे केंद्र चालू करण्यात आलेले नाही.आग लागण्याची दुर्घटना घडली की घटनास्थळी नागरिक मोठी गर्दी करतात; त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्याच्या कामात अडथळा होत असल्याचे चित्र दिसून येत होते. या रस्त्यावर अनेक गोदामे असून त्यातील किती गोदाम मालकाकडे परवाने आहेत व असतील तर त्यांना परवाना देताना कुठल्या निकषांच्या आधारावर परवाने देण्यात आले होते. यासारख्या आगीमुळे असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.