इंदापूर : इंदापूर शहरात विविध ठिकाणी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पर्यावरणपूरक रथ पोहोचवला. यामध्ये दर वर्षीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुका काढल्या नाहीत. मात्र, नगरपरिषदेने केलेल्या आवाहनाची नागरिकांनी अंमलबजावणी करीत, पर्यावरणपूरक विसर्जनाच्या रथाला उदंड प्रतिसाद दिला.
यामध्ये मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या नियोजनात व नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख म्हणून दत्तू ढावरे, सर्जेराव मखरे, कुंदन माने, तुषार मखरे, अशोक अडसूळ, ज्ञानदेव मखरे, सतीश चव्हाण, लक्ष्मण लोखंडे, रमेश उकिरडे, धनाजी ढावरे, धनाजी भोंग, शेखर लोंढे, आकाश ढावरे, मयूर मखरे, विकी वाल्मिकी, बापू खरे, विलास चव्हाण, अल्ताफ पठाण, अशोक चिंचकर, लीलाचंद पोळ, दीपक शिंदे, सुनील लोहिरे, काशिनाथ शिंदे यांच्या टीमने काम पाहिले.
इंदापूर शहरात श्रीगणेश मूर्ती स्वीकारण्यासाठी महतीनगर, श्रीराम सोसायटी परिसर, बाबाचौक परिसर, दत्तनगर, राधाकृष्ण अपार्टमेंट, सोनाई नगर, अंबिका मंदिर परिसर, गणेशनगर पर्वत, व्यंकटेशनगर, बाजारतळ, साईनगर, अंबिकानगर, ४० फुटी रोड दोनी बाजू, बटरगल्ली, शास्त्री चौक, रामदास पथ, मंडई गल्ली, खडकपुरा, मेनरोड नेहरू चौक, सावतामाळीनगर परिसर, सातपुडा, नामदेव मंदिर परिसर, बावडावेस, पांधारा नाला परिसर, यमाई देवी परिसर, ठाकरगल्ली, तापी परिसर, बाब्रस मळा, खुळे चौकापर्यंत व अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जन रथ पोहोचला.
विसर्जन रथामध्ये श्रीगणेशाची मूर्ती देताना नागरिक व बालगोपालांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषणा करीत मूर्ती सुपूर्द केल्या. तर शहरात दिवसभर शांततेचे वातावरण असल्याने, आपोआपच गणरायाला भावपूर्ण निरोप मिळाला आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नगरपरिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला व कोविड प्रतिबंध करण्यासाठी मोठी मदत केली.
दर वर्षी गणेश चतुर्दशीला शहरात सकाळी ११ वाजल्यापासूनच गल्लोगल्ली विविध वाद्यांचा जल्लोष ऐकू आला नाही. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे नागरिक व बालगोपालांच्या आनंदावर विरजण पडले आहे. इंदापूर पोलिसांनी पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यामुळे शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता, शहरात दिवसभर शांततेत विसर्जन प्रक्रिया पार पडली.
सायंकाळी ५ नंतर इंदपूर शहरातील जलवाहिनी केंद्र येथे विधिवत नागरिकांनी दिलेल्या गणरायाचे पूजन व आरती करून, मुख्याधिकारी रामराजे कापरे, नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा व नगरपरिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत गणपती विसर्जन करण्यात आले.
फोटो ओळ : इंदापूर नगरपरिषदेच्या पर्यावरणपूरक विसर्जन रथामध्ये गणेश मूर्ती देताना नागरिक.