पुणे/किरण शिंदे : पुरोगामी शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्यात जादूटोणा करून अघोरी पूजा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी वैकुंठ स्मशानभूमीत पेटत्या चितेसमोर दोन तृतीयपंथीयांनी अघोरी पूजा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता सिंहगड परिसरातूनही पूजेचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. मूल होण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी यासाठी एका उच्चशिक्षित कुटुंबाने स्मशानभूमीत अघोरी पूजा घातली. इतकच नाही तर सुनेला मानवी हाडाची भुकटी, घुबडाचे पाय आणि कोंबड्याचं मुंडकं खाण्यास भाग पाडलं.
पुण्याच्या धायरी परिसरात राहणारं उच्चशिक्षित कुटुंब.. आई-वडील मुलगा आणि मुलगी.. 2019 मध्ये मोठ्या थाटामाटात एकुलत्या एका मुलाचं लग्न लावून दिलं. नवी नवरी घरात आल्याने सगळे आनंदात होते. मात्र नव्याचे नऊ दिवस सरले आणि नवविवाहितेचा छळ सुरू झाला. माहेरहून पैसे आणावेत, दागिने आणावेत यासाठी तिचा अतोनात छळ सुरू झाला. मूलबाळ होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या विवाहितेसोबत अघोरी पूजेसारखे प्रकार घडू लागले. अमावस्येच्या रात्री या कुटुंबातील सर्व सदस्य पीडित विवाहितेसह स्मशानभूमीत गेले. नुकत्याच जळालेल्या मृतदेहाची राख आणि हाडे गोळा करून त्या ठिकाणी अघोरी पूजा घातली. इतकंच नाही तर मानवी हाडं, घुबडाचे पाय आणि मेलेल्या कोंबड्याचं मुंडकं खाण्यासाठी या महिलेवर जबरदस्ती करण्यात आली. नकार देताच डोक्यावर बंदूक ठेवून हाडांची राख खाण्यास भाग पाडलं. दोन वर्षापासून हे प्रकार सुरू होते.
दरम्यान पीडित महिलेने पोलिसात धाव घेतल्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा दाखल झाल्यानंतर पोकळे कुटुंबीय पसार झाले आहेत. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. मात्र ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पुरोगामी म्हनवल्या जाणाऱ्या पुण्यात हे चाललं तरी काय असे प्रश्न विचारले जाऊ लागले. राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलीय. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.