घोडेगाव : वाढते मनोरे, कमी होणारी जंगले यामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बीएनएचसी (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) यांनी केलेल्या सर्वेक्षणात चिमण्या मोठ्या प्रमाणात शहरे व गावांमधून हद्दपार होत असल्याचे पुढे आले आहे. चिमण्यांच्या संरक्षणाबाबत पाश्चिमात्य देशांमध्ये जागरूकता झाली असून, आपल्याकडेही याची आवश्यकता आहे. जागतिक चिमणी दिनानिमित्त त्यांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘एक होती चिमणी एक होता कावळा’ ही गोष्ट आईकडून अनेकांनी लहानपणी ऐकली असेल. मात्र आजकाल ही गोष्टच राहिली आहे. कारण चिमण्यांचा किलबिलाट फार क्वचितच ऐकू येतो. काल या चिमण्या आपल्या घरात होत्या, अंगणात होत्या, झाडांवर होत्या; पण मानवाने निर्माण केलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे तसेच गाड्यांचा आवाज, मोबाईल मनोरे व शेतीमध्ये वाढत्या रसायनांमुळे चिमण्यांची संख्या खूप कमी होऊ लागली आहे. साहित्य, काव्य व संस्कृतीमध्ये चिमण्यांचा उल्लेख ठिकठिकाणी आढळतो. लहानपणी आई बाळाला झोपवताना एक होती चिमणी, एक होता कावळा, चिमणीचं घर मेणाचं, कावळ्याचं घर शेणाचं ही गोष्ट सांगत असायची.या गोष्टीत जसे चिमणीचं घर कावळा बळकावतो, तसे माणसाने चिमणीची घरं बळकावली आहेत. (वार्ताहर)
चिमण्यांच्या घरकुलांवर मानवी संक्रांत
By admin | Published: March 20, 2017 4:15 AM