पुणे : देशात महिलांची मानवी तस्करी होत असण्यामागे आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा हात असण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोग संयुक्त कृती कार्यक्रम राबवण्याबाबत गंभीर आहे. असा कार्यक्रम तयार करण्यासंबधी राष्ट्रीय महिला आयोगाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.
राज्य महिल आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांची दिल्लीत भेट घेतली. औरंगाबाद शहरामधून ३९ दिवसांमध्ये ५८ महिला गायब झाल्यासंबधी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत चाकणकर यांनी दिल्लीत शर्मा यांची भेट घेतली व त्यांना राज्यातील या घटनांची माहिती दिली. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात केलेल्या कामाची माहितीही त्यांना शर्मा यांना दिली.
चाकणकर यांनी सांगितले की शर्मा यांनी याची गंभीर दखल घेतली. देशातही अशा काही घटना होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. याबाबत एखादा संयुक्त कृती समिती राबवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली व तशा सुचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. राज्य महिला आयोग यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे असे त्यांना सांगितले असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.
दरम्यान राज्यातील घटनांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आयोगाच्या माध्यमातून पत्र पाठवले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. राज्यातून महिला व मुली गायब होण्याचे प्रकार वाढत आहेत. पोलिसांकडून हरवलेल्या मुली व महिलांबाबतचे अहवाल मिळत असून त्यातील संख्येवरून ही बाब चिंताजनक असल्याचे दिसते आहे. सरकारने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी या पत्रात चाकणकर यांनी मुख्यमंत्ऱ्यांकडे केली आहे.