वडगाव मावळ : ओमकार खराडे याच्या मदतीसाठी अनेक जण सरसावले आहेत. त्याच्यावर सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी ‘मोठ्या दवाखान्यातील उपचारांसाठी मदत मिळेल का?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन मदतीचा ओघ सुरू झाला आहे. जांभूळ येथील ओमकार शंकर गराडे (वय ७) याला गेल्या महिन्यात औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला इंजेक्शन देण्यात आले. त्याला इंजेक्शनच्या जखमा झाल्या. त्यामुळे तो अंथरुणाला खिळून आहे. ओमकारची परिस्थिती बिकट आहे. त्याचे वडील मोलमजुरीचे काम करतात. ओमकारला लहान भाऊ व बहीण आहे. कुटुंबात ओमकारचे वडील एकटेच कमावते आहेत. घरचा खर्च कसा भागवयाचा, असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यातच ओमकारच्या आजाराचा खर्च वाढला आहे. त्याला उपचारासाठी मदतीची गरज आहे, अशी बातमी ‘लोकमत’ने दिली होती. त्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते अतुल वायकर, सरपंच अंकुश काकरे, मयूर काळोखे, निरंजन चव्हाण, अजय कुंजीर, दत्तात्रय जांभूळकर, शैलेश वहिले, सुनीत कदम, किरण हगवणे, देविदास जांभूळकर, माजी सरपंच संतोष जांभूळकर यांनी आर्थिक मदत केली. त्यानंतर त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)
ओमकारसाठी मदतीचा ओघ सुरू
By admin | Published: November 03, 2014 5:00 AM