पुणे : महापालिकेच्या वतीने नव्याने हद्दीत समाविष्ट होणाऱ्या येवलेवाडीचा विकास आराखड्यामध्ये (डी.पी.) आरक्षणे बदलणे, चुकीच्या ठिकाणी आरक्षण टाकणे असे अनेक प्रकर झाले असून, यामध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे गटनेते वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी येवलेवाडी येथील आरक्षण काढण्यासाठी आमदार योगेश टिळेकर यांना एक कोटी रुपयांची महागडी मोटार भेट दिल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.
येवलेवाडीच्या डीपीबाबत मोरे यांनी सोमवारी महापालिकेत पत्रकार परिषेद घेतली. मोरे म्हणाले की, आमदार टिळेकर गेली ११ महिने वापरत असलेली एक कोटी रुपये किमतीची मोटार एका प्रथितयश बांधकाम व्यावसायिकाची आहे. त्यांच्याच कंपनीतून दरमहा मोटारीचा हप्ता भरला जातो. या डेव्हलपर्सच्या येवलेवाडीतील जागेवरील आरक्षण उठविण्याच्या बदल्यात त्यांनी ही मोटार टिळेकर यांना घेऊन दिली आहे, असा आरोप करत मोरे यांनी काही कागदपत्र्े व पुरावेही सादर केली आहेत. आमदार टिळेकर यांनी याप्रकरणी खुलासा करावा आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही मोरे यांनी केली आहे.
मोरे म्हणाले की मागील वर्षी सर्वसाधारण सभेमध्ये भाजपाने बहुमताच्या जोरावर येवलेवाडीचा विकास आराखडा मंजूर केला. यानंतर अवघ्या २४ दिवसांनी या डेव्हलपरच्या नावाने एक कोटी ४ लाख ७० हजार रुपये किमतीची आलिशान मर्सिडीज मोटार खरेदी करण्यात आली. मोटार शोरुममधून घेताना टिळेकरांचे बंधूही होते. तेव्हापासून ही मोटार टिळेकर यांच्याकडेच आहे. विशेष असे की टिळेकर कुटुंबीयांकडे विविध मेकच्या मोटारींचे क्रमांकही ००७८ असेच आहेत. मर्सिडीज मोटारीसाठी या डेव्हलपरने ७४ लाख रुपयांचे कर्जही घेतले आहे. त्याचा मासिक दीड लाख रुपयांचा हप्ता कंपनीच्या खात्यातूनच भरला जातो. संबंधित डेव्हलपर्सची येवलेवाडी परिसरात सुमारे ७० एकर जागा आहे. महापालिकेने त्यांच्या काही जागेवर आरक्षणही टाकले होते. परंतु नियोजन समितीने ही सर्व आरक्षणे उठवून टाकली आहेत. या बदल्यातच टिळेकर यांना ही महागडी मोटार देण्यात आली.बिनबुडाचे आरोप : योगेश टिळेकरविधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्याकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. माझ्या मित्राने दोन दिवस गाडी वापरण्यासाठी दिली असून, गाडी माझ्या नावावर असती व हप्ते संबंधित बांधकाम व्यावसायिक भरत असते तर समजू शकतो. परंतु केवळ राजकारण करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. विरोधी पक्ष असताना मनसेने शहराचा डी.पी. केला. त्या वेळी हजारो एकर क्षेत्र निवासी करण्यात आले. त्या वेळी त्यांना गाड्याच मिळाल्या होत्या का, असा सवालदेखील आमदार योगेश टिळेकर यांनी केला.