पुणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार गांधी जयंतीचे औचित्य साधून बुधवार (दि.२) ऑक्टोबरपासून शहरामध्ये 'सिंगल युज' म्हणजे एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकला शंभर टक्के बंदी घातली आहे. या बंदीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात प्लॅस्टिक कलेक्शन सेंटर सुरु केले असून, अशा प्रकारचे प्लॅस्टिक त्वरीत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान बंदी नंतर शहरामध्ये सिंगल युज प्लॅस्टिकच्या वस्तू, पिशव्याची विक्री अथवा वापर करताना कोणी अढळून आल्यास संबंधितावर थेटे गुन्हा दाखल करणे व प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी लोकमतला दिली. केंद्र शासनाने येत्या २ ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिक आणि थमोर्कोलच्या वापराला शंभर टक्के बंदी केली आहे. या संदभार्तील आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यालये, उद्योगांना दिले आहेत. या निर्णयानुसार महापालिकेच्या वतीने शहरामध्ये शंभर टक्के प्लॅस्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात यापूर्वी देखील प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला, त्यानुसार कारवाई देखील करण्यात आली. परंतु अद्यापही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर सुरु आहे. शहरामध्ये रस्त्यावर, चौका-चौकात प्लॅस्टिकच्या गारबेज बॅग्जची विक्री सुरु आहे. बहुतेक सर्व भाजी मंडई, दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्या दिल्या जातात. शहरामध्ये नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये बहुतेक सर्व बाजारापेठांमध्ये खुल्याआम थमोर्कोलची विक्री सुरु होती. आजही सर्वच दुकानांमध्ये थमोर्कोल विकला जातो. याशिवाय प्लॅस्टिकचे चमचे, प्लेट, डिश, क्लास, पिण्याच्या पाण्याच्या बोटल, नॉन मायक्रोव्होन बॅग्ज, सर्वत्र विक्री होताना दिसत आहेत. याबाबत माधव जगताप यांनी सांगितले की, शहरामध्ये २ ऑक्टोबरपासून शंभर टक्के प्लॅस्टिक बंदीची कारवाई अत्यंत कडक अंमलबजावणी सुरु होणार आहे. यासाठी सुरुवातीचे काही दिवस महापालिकेच्या सुमारे १६५ आरोग्य कोठ्या, सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये प्लॅस्टिक कलेक्शन सेंटर सुरु करण्यात येणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत नागरिक, दुकानदार, भाजी विक्रेते आदी सर्वांनी आपल्याकडे असलेले सिंगल युज प्लॅस्टिक तातडीने महापालिकेच्या सेंटरवर जमा करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान त्यानंतर महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरामध्ये अत्यंक कडक कारवाई सुरु करण्यात येणार असून, विक्री करणा-या व वापर करणा-यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड करणे व थेट गुन्हे दाखल करण्याची देखील कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने प्लॅस्टिक विक्री आणि वापर करणा-यांवर कारवाई करण्यासाठी सुमारे १५ टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीम मार्फत संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे. ---------------------गेल्या वर्षभरात शहरात ५ हजार ८९६ किलो प्लॅस्टिक जप्तराज्य शासनाने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर पुणे शहरामध्ये देखील महापालिकेच्या वतीने प्लॅस्टिक विक्री आणि वापर करणा-यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सर्वच प्रकारच्या प्लॅस्टिक वापराला बंदी असल्याने महापालिकेच्या वतीने प्रामुख्याने बाजार पेठा, मंडई परिसरामध्ये ही कारवाई केली. यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये शहरामध्ये तब्बल ५ हजार ८९६ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. यामध्ये व्यावसायिक, नागरिकांकडून तब्बल १९ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपासून सिंगल युज प्लॅस्टिकला शंभर टक्के बंदी : माधव जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 7:00 AM
विक्री, वापर आढळून आल्यास थेटे गुन्हे दाखल करणार
ठळक मुद्देगेल्या वर्षभरामध्ये शहरामध्ये तब्बल ५ हजार ८९६ किलो प्लॅस्टिक जप्ततब्बल १९ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा दंड देखील वसूलनागरिक, दुकानदार, भाजी विक्रेते आदी सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टिक जमा करण्याचे आवाहन