'कोरोना'चा गुणाकार रोखायचा असेल तर एकमेव पर्याय शंभर टक्के लॉकडाऊन : अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 03:10 PM2020-04-02T15:10:24+5:302020-04-02T15:35:18+5:30
सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने जुन्नरमध्ये 'कोरोना' चा रूग्ण....
नारायणगाव : लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सांगत आहेत. तरी देखील त्याचे पालन होत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथे आढळलेले 'कोरोना' बाधित रुग्ण आहे, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
'कोरोना' संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात गेल्यावर विषाणूंचा गुणाकार होतो, असे मुख्यमंत्री आपल्या आवाहनात वारंवार सांगत आहेत. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथे एका व्यक्तीला 'कोरोना'ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर हा गुणाकार म्हणजे काय हे सांगणारा एक व्हिडीओ खासदार डॉ. कोल्हे यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यामध्ये गुणाकार कसा होता हे दाखविण्यासाठी एक ग्राफिक्स तयार केला असून त्याद्वारे संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली आहे.
डॉ. कोल्हे यांनी डिंगोरे येथील उदाहरण दिले आहे. त्यामध्ये मूळ रुग्ण १७ मार्च रोजी मुंबई वरून जुन्नर येथे आला. तिथे लॉकडाऊनचे पालन न करता तो अनेकांना भेटला. त्यानंतर २७-२८ मार्चला ही व्यक्ती 'कोरोना' बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या व्यक्तीला त्रास सुरू झाला. त्यांच्यामध्ये लक्षण दिसायला लागली. ही व्यक्ती १७ मार्च रोजी या एकाच दिवशी तालुक्यातील अनेकांना भेटली होती. त्या सर्वांना अत्यंत जिकरीने प्रशासनाने शोधले. त्यानंतर त्यातील दोन जणांना कोरोना ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील एक व्यक्ती ही मुंबईला वास्तव्य करणारी होती, तर दुसरी व्यक्ती डिंगोरे येथे वास्तव्यास होती. डिंगोरे येथील व्यक्तीचे ३० मार्च रोजी विलगीकरण करण्यात आले आणि ३१ मार्च रोजी या व्यक्तीला 'कोरोना'ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
डॉ. कोल्हे म्हणाले की, डिंगोरे येथील मूळ रुग्णांच्या सानिध्यात १७ मार्च रोजी आली होती. ३० मार्च रोजी या व्यक्तीला लागण झाल्याचे निष्पन्न झाले. याचा अर्थ १७ मार्च ते ३० मार्च या व्यक्तीच्या शरीरात हा विषाणू होता. आता १७ ते ३० मार्च या कालावधीत ही व्यक्ती किती जणांच्या संपर्कात आली असेल याचा जर तुम्ही विचार केलात या विषाणूंचा गुणाकार कशा पद्धतीने होतो हे लक्षात येते. त्याहीपेक्षा या आजाराची लक्षण दिसायला सुरुवात होईपर्यंत १४ दिवसांचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे ३० मार्चला सकाळी या व्यक्तीच्या संपर्कात जी व्यक्ती आली असेल तिच्यामध्ये लक्षणे दिसण्यासाठी कदाचित १३ एप्रिल उजाडू शकतो. आता १३ एप्रिलपर्यंत या व्यक्तीच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या असतील याचा अंदाज बांधणे कठीण जाते. यातल्या सगळ्यांना विषाणूची लागण झाली असू शकते अथवा एकालाही नाही अथवा काही जणांना लागण झालेली असू शकते. केवळ एका व्यक्तीने लॉकडाऊन न पाळल्यामुळे आज एवढे सगळेजण धोक्यात आहेत आणि एवढ्या सगळ्यांच्या संपर्कात आलेले अनेक जण धोक्यात आहेत.
..................
'कोरोना'च्या विषाणूंचा गुणाकार रोखायचा असेल तर एकमेव पर्याय आहे तो म्हणजे लॉकडाऊन शंभर टक्के पाळणे. प्रशासनाला सहकार्य करणे. आपण हे सहकार्य कराल. जर कुणी आपल्या संपर्कात आले असेल आणि आपल्यामध्ये लक्षणं दिसत असतील तर तातडीने प्रशासनाला त्याची कल्पना द्या. प्रशासनाला शंभर टक्के सहकार्य करून लॉकडाऊन पाळू या.
- खासदार डॉ. कोल्हे.