पुणे : जिल्हा करमणूक कर विभागाने १५४ कोटी रुपयांची करवसुली करून शासनाने दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे. नोटाबंदीमध्ये जुन्या नोटांमध्ये थकबाकी भरण्याची परवानगी देण्यात आल्याने सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये जमा झाले. तर वन डे व आयपीएल सामन्यांमुळेदेखील शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य झाले असल्याची माहिती जिल्हा करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील-चौधरी यांनी दिली.शासनाच्या वतीने जिल्हा करमणूक कर विभागाला सन २०१६-१७ या वर्षांसाठी १५४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. यात वर्षाच्या सुरुवातीलचा राज्यात सर्वाधिक गाजलेल्या सैराट चित्रपटामुळे करमणूक कर विभागाला तब्बल सहा कोटी रुपयांचा फटका बसला. मराठी चित्रपटांना करमणूक कर माफ असल्याने सैराट चित्रपटाने शंभर ते दीडशे कोटी रुपयांची कमाई करूनही करमणूक कर विभागाला महसूल मिळालाच नाही. त्यातच सैराटच्या धसक्याने दोन-अडीच महिन्यांत एकही चांगला हिंदी चित्रपट सुरु करण्यात आला नाही. या सर्वांचा मोठा परिणाम करमणूक कर विभागाच्या वसुलीवर झाला. परंतु त्यानंतर शासनाने आॅगस्ट महिन्यात ५०० व १ हजार रुपयांच्या चलनातील नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शासनाने काही दिवस जुन्या नोटांमध्ये शासनाच्या विविध विभागाच्या थकबाकीची रक्कम जमा करण्याची परवानगी दिली. यामुळे करमणूक कर विभागाला सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा कर जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा झाला. त्यानंतर वादग्रस्त ठरलेल्या सनबर्न फेस्टिव्हलमुळे सुमारे ७७ लाखांचा कर जमा झाला. यंदा शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थर्टी फर्स्ट व होळीच्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले, जिल्हा प्रशासनाच्या वतीने बेकायदेशीरपणे पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या हॉटेलवर केलेल्या कारवाई या सर्व गोष्टींमुळे जिल्हा करमणूक कर विभागाला करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य झाले असल्याचे पाटील-चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
करमणूक कर विभागाची शंभर टक्के करवसुली
By admin | Published: April 01, 2017 2:16 AM