लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातल्या शहरी भागात कोरोना रुग्णसंख्या वेगाने कमी होत असली तरी ग्रामीण भागात अद्यापही स्थिती गंभीरच आहे. वेल्हा तालुक्याचा अपवाद वगळता अन्य सर्व तालुक्यांत आजही सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. यामुळे जिल्हा अथवा एखादा तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी आणखी बराच वेळ जावा लागणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागासोबतच ग्रामीण भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला. एप्रिल महिन्यात सर्वाधिक संसर्ग शहरी भागात होता. नंतरच्या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात अधिक वाढला. यामुळेच आजही जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यांत कोरोनाची स्थिती गंभीर आहे. शहरी भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने येथील बहुतेक निर्बंध शिथिल करण्यात आले.
ग्रामीण भागाचा ‘पाॅझिटिव्हिटी रेट’ दहा टक्क्यांच्या खाली आला असला तरी रुग्णसंख्या अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नाही. यामुळेच ग्रामीण भागातील निर्बंध अद्यापही शिथिल झालेले नाहीत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या लक्षात घेतली तर तालुका अथवा जिल्हा कोरोनामुक्त होणे सध्या तरी कठीण दिसते.
चौकट
आतापर्यंत झालेल्या चाचण्या : १२ लाख ८० हजार ५०७
बाधित होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) : २२.३.
रूग्ण बरे होण्याचे होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) : ९५.६७
चौकट
ग्रामीण भागातील एकूण रूग्ण : २ लाख ३२ हजार ८४१
आत्तापर्यंत बरे झालेले रूग्ण : २ लाख २३ हजार ७९४
उपचार सुरू असलेले रूग्ण : ५ हजार ६३२
ग्रामीण भागातले आत्तापर्यंतचे मृत्यू : ३ हजार ४१५
चौकट
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय कोरोनाबाधित
तालुका सक्रिय रूग्ण
आंबेगाव ११७
बारामती ३२१
भोर ७८
दौंड २५९
हवेली ३२३
इंदापूर ५६६
जुन्नर ७६०
खेड ७३०
मावळ ८३०
मुळशी ७३०
पुरंदर ५७२
शिरूर ३००
वेल्हा ४६
एकूण ५,६३२
--------
ग्रामीण भागात अद्यापही निर्बंध शिथिल नाही
राज्य शासनाने 1 जून पासून राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरू केली आहे. शासनाने अनलाॅक करताना 5 स्तर निश्चित केले असून, त्यानुसार स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. पुणे जिल्ह्यात शहरी भागात रुग्ण संख्या झपाट्याने कमी झाल्याने बहुतेक निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु ग्रामीण भागात अद्याप ही रुग्ण संख्या अपेक्षित प्रमाणात कमी न झाल्याने उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांनी ग्रामीण भागाचा पाॅझिटिव्ह दर दहा टक्क्यांपेक्षा कमी असला तरी निर्बंध शिथिल करणार नसल्याचे स्पष्ट केले.
----------
ग्रामीण भागातील परिस्थिती सुधारतेय
शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील आता रुग्ण संख्या हळुहळू कमी होत आहे. यामुळेच ग्रामीण भागातील हाॅटस्पाॅट गावांची संख्या साडे चारशे वरून थेट 86 पर्यंत खाली आहे. परंतु तालुक्यांमधील ॲक्टिव्ह रुग्ण अद्यापही अपेक्षित प्रमाणात कमी झालेले नाही.
- डाॅ.भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी