पुणे : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसाहाय्य दिले जाते. परंतु पुणे जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नसल्याने घरकुल मंजूर होऊनही लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली. जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ११२३ कुटुंबांना जिल्ह्यात विविध ६५ ठिकाणी घरकुलासाठी सरकारी जागा उपलब्ध करून दिली.
शासनाकडून गरीब व सर्वसामान्य लोकांसाठी घरे बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र जिल्ह्यात जागा नसल्याने हजारो लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली. या सर्व लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी जागा मिळावी यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या पाच हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांकडे जागा नाही. या सर्व लाभार्थ्यांना जिल्ह्यात सरकारी, गायरान जमीन उपलब्ध करून द्यावी अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. परंतु सरकार दरबारी गरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या जागेचा प्रश्न खूप वर्षांपासून प्रलंबित पडला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एकाच वर्षात एक हजार १२३ कुटुंबांना हक्काच्या घरासाठी सरकारी जागा उपलब्ध करून दिली.
चौकट
जिल्ह्यातील तालुकानिहाय जागा व लाभार्थी संख्या
तालुका जागा लाभार्थी
हवेली २ २३
मावळ ५ ३६
मुळशी ५ १८
आंबेगाव ६ ७६
जुन्नर २६ २२
खेड १७ १०८
पुरंदर ७ १३
दौंड ९ १२७
बारामती २३ २५२
इंदापूर १३ २६२
शिरूर २१ १८६
भोर ४ -
वेल्हा २ -
एकूण ६५ ११२३